काँग्रेसला अयोध्येत राम मंदिरच नकोय; योगी आदित्यनाथ यांचा खळबळजनक आरोप

अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन 5 ऑगस्टला होत आहे. या कार्यक्रमावरुन वादंग सुरू झाला असून, काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत.
uttar pradesh chief minister yogi adityanath targets congress on ram mandir issue
uttar pradesh chief minister yogi adityanath targets congress on ram mandir issue

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत  ५ ऑगस्टला होणार आहे. अयोध्येत दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी आधीच भूमिपूजन केले होते, असा दावा ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी केला आहे. यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. काँग्रेसला अयोध्येत राम मंदिर नकोच आहे, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.  

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या भूमिपूजनाचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्सिंगचे बंधन सर्वांनाच पाळावे लागेल. यामुळे कार्यक्रमाला दोनशेपर्यंत व्यक्ती सहभागी होतील. या कार्यक्रमाचे निमंत्रण उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांना मिळाले आहे. त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे म्हटले आहे. याचवेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी आणि मुरलीमनोहर जोशी यांना मात्र, निमंत्रण पाठविण्यात आलेले नाही. अडवानी, जोशी आणि उमा भारती हे सर्वजण बाबरी मशिद पाडल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात आरोपी आहेत. 

अडवानी आणि जोशी यांनाच राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमातून डावलल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत होती. याचबरोबर भाजपमध्येही याबद्दल नाराजीचा सूर होता. अखेर अडवानी आणि जोशी हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाला हजेरी लावतील, असे सांगण्यात आले आहे. अडवानी आणि जोशी यांची अशा प्रकारे व्हर्च्युअल उपस्थिती कार्यक्रमाला असेल. 

दिग्विजयसिंह यांनी भूमिपूजन पुढे ढकलावे, अशी सूचना ट्विटरवर केली आहे. याचबरोबर दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी या अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, राम मंदिराचे भूमिपूजन करण्यास 5 ऑगस्ट हा मुहूर्त अशुभ असून, तो पुढे ढकलावा, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर राम मंदिराचे बांधकाम सुरू होत आहे. पंतप्रधानांनी हट्ट सोडावा अन्यथा यामुळे राम मंदिराच्या कामात अडथळे निर्माण होतील. या अशुभ मुहू्र्ताबाबत स्वामी स्वरुपानंद यांनीही इशारा दिलेला होता. मोदी हे हजारो वर्षांपासून असलेल्या परंपरांपेक्षा मोठे आहेत का? हेच हिंदुत्व आहे का? 

राम मंदिराच्या पुजाऱ्यांसह 14 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आता केंद्रीय गृहमंत्री आणि उत्तर प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष पॉझिटिव्ह आढळले आहेत. याचबरोबर उत्तर प्रदेशात एका मंत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यभ कोरोना पॉझिटिव्ह असून, कर्नाटकचे मुख्यमंत्रीही पॉझिटिव्ह आले आहेत. आता मोदी अशुभ मुहूर्तावर भूमिपूजन करुन आणखी किती जणांना रुग्णालयात पाठवणार आहेत. योगी आदित्यनाथ यांनीच आता मोदींची समजूत काढावी. 

यावर योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, रामाचा जन्म झाला त्या अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होऊ नये, अशी काँग्रेसची इच्छा आहे. काँग्रेसने भूतकाळातील गोष्टी पाहण्याची गरज आहे. राम जन्मभूमीत रामाचे मंदिर व्हायलाच हवे. ही आमची आणि देशातील जनतेची भावना आहे. काँग्रेसला अयोध्येत भूमिपूजन नको आहे. त्यांना हा मुद्दा तसाच टांगता ठेवायचा आहे. त्यावर कायमस्वरुपी तोडगा नको आहे. काँग्रेसकडून धर्म, जात आणि श्रद्धेच्या आधारावर जनतेमध्ये फूट पाडली जात असून, सत्ता मिळवण्यासाठी ते ही खेळी खेळत आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com