उत्तर प्रदेशात काँग्रेसचा चेहरा प्रियांका गांधीच !

उत्तर प्रदेशात 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी काँग्रेसने आतापासूनच सुरू केली आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या योगी सरकारला आक्रमकपणे उत्तर देताना दिसत आहेत.
uttar pradesh assembly polls to be fought under leadership of priyanka gandhi
uttar pradesh assembly polls to be fought under leadership of priyanka gandhi

लखनौ : उत्तर प्रदेशात मागील काही काळापासून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या आक्रमक झाल्या आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यातील सत्ताधारी भाजपला त्या थेट लक्ष्य करीत आहेत. राज्यातील काँग्रेस पक्षाची धुरा आता त्यांच्याच हातात एकवटली आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनीही उत्तर प्रदेशात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका पक्ष प्रियांका गांधी यांच्याच नेतृत्वाखाली लढेल, असे जाहीर केले आहे. 

प्रियांका गांधी यांनी गँगस्टर विकास दुबे याच्या चकमकीवरुनही राज्य सरकारला धारेवर धरले होते. राज्यातील ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. याबाबत बोलताना अजयकुमार लल्लू म्हणाले की, उत्तर प्रदेशात 2022 मध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुका प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणार आहेत. त्याच पक्षाचा चेहरा असतील. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस कोणत्याही पक्षाशी आघाडी करणार नाही. मात्र, राज्यातील जनता, लोकशाही, युवक, शेतकरी, गरीब, दलित, वंचितांसोबत आमची आघाडी असेल. 

उत्तर प्रदेश ही प्रियांका गांधी यांची भूमी आहे. त्या आणि त्यांच्या कुटुंबीयांना उत्तर प्रदेशच्या मातीबद्दल प्रेम आहे. राज्यातील कोट्यवधी जनतेच्या मनात त्या राहतात. त्यांच्याच नेतृत्वाखाली राज्यात विधानसभा निवडणुका काँग्रेस लढेल. उत्तर प्रदेशात त्याच्या देखरेखीखाली सरकार बनावे अशी राज्यातील जनतेची इच्छा आहे, असे लल्लू यांनी सांगितले.  

राज्यातील भाजपचे सरकार प्रियांका गांधी यांना घाबरते. त्यांनी रस्त्यावर उतरून सोनभद्रमध्ये आदिवासींसाठी लढा दिला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. प्रत्येक मुद्द्यावर त्या सरकारची कोंडी करीत आहेत. राज्यातील जनतेशी निगडित आणि त्यांच्या हितावर परिणाम करणाऱ्या मुद्द्यावर प्रियांका सरकारला धारेवर धरत आहेत. यामुळे विरोधकांकडून त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे लल्लू यांनी नमूद केले. 

प्रियांका गांधी या उत्तर प्रदेशात सक्रिय झाल्याने त्यांना भाजपकडून लक्ष्य केले जात आहे. काही दिवसांपूर्वीच लोधी इस्टेटमधील सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारने बजावली होती. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपकडे  (एसपीजी) सुरक्षेची जबाबदारी असलेल्या व्यक्तीला हा सरकारी बंगला देण्यात येतो असा नियम आहे. त्यामुळे  या नियमाच्या आधारेच प्रियांका यांना हा बंगला रिकामा करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. यावरुन मोठा राजकीय गदारोळ उडाला होता. विरोधी पक्षांनीही सरकारला लक्ष्य केले होते. 

गांधी कुटुंबीयांना सध्याच्या परिस्थितीमध्ये स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या सुरक्षेची आवश्यकता नाही, या अहवालाच्या आधारे केंद्र सरकारने त्यांची एसपीजी सुरक्षा हटवण्याचा निर्णय घेतला होता. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी हत्या झाली होती. तेव्हापासून गांधी कुटुंबीयांना एसपीजी सुरक्षा देण्यात आली होती. लोधी इस्टेटमधील 6-बी बंगला क्रमांक- 35 मध्ये गेल्या दोन दशकांपासून प्रियांका गांधी राहत आहेत. त्यांनी आता हा बंगला सोडण्याची तयारी केली आहे.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com