us president donald trump criticizes state governors in meeting | Sarkarnama

अमेरिका जळतेय अन् ट्रम्प वाजताहेत 'फिडेल'

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 जून 2020

कृष्णवर्णीय व्यक्ती पोलिस कारवाईत मारला गेल्यानंतर अमेरिकेत सुरू झालेला आंदोलनाचा वणवा दिवसेंदिवस वाढत आहे. यातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रक्षोभक विधाने करुन याला खतपाणी घालत असल्याचे चित्र आहे. 

वॉशिंग्टन : अमेरिकेत आंदोलनाचा भडका उडाला असून, हे आंदोलन हाताळण्यात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अपयशी ठरल्याची टीका होत आहे. यातून धडा घेऊन संयमाने परिस्थिती हाताळण्याऐवजी ट्रम्प यांनी बेताल वक्तव्ये सुरूच ठेवली आहेत. अनेक प्रांतांचे गव्हर्नर दुबळे असून, आंदोलकांना काबूत आणणे शक्य होत नसल्यामुळे ते मूर्ख असल्याचे चित्र निर्माण करीत आहेत, अशी विधाने त्यांनी केली आहेत. 

रोम जळत असताना निरो ज्याप्रमाणे फिडेल वाजवत होता, त्याप्रमाणे ट्रम्प आपल्या वक्तव्यांनी परिस्थिती बिघडवत आहेत. ट्रम्प यांनी रोझ गार्डनमध्ये देशाला संबोधून भाष्य करण्यापूर्वी पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला. ट्रम्प यांनी लष्कराला पाचारण करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्याआधी ट्रम्प यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती. त्यावेळी गव्हर्नरांसह कायदा अंमलबजावणी व राष्ट्रीय सुरक्षा अधिकारीही उपस्थित होते.

गव्हर्नरांना उद्देशून ट्रम्प म्हणाले की, तुमच्यापैकी बहुतेक जण दुबळे आहेत. तुम्हाला बरेच कठोर व्हावे लागेल. तुम्ही आंदोलकांना अटक करायला हवी. मिनियापोलिसमध्ये शांतता प्रस्थापित केलेल्या नॅशनल गार्डसना तुम्हीसुद्धा तैनात करायला हवे. हिंसाचार करणाऱ्या लोकांचा तुम्ही छडा लावा, त्यांना दहा वर्षे तुरुंगात टाका, मग तुम्हाला असे प्रकार पुन्हा कदापि घडताना दिसणार नाहीत. वॉशिंग्टनमध्ये आम्ही हेच करतो आहोत. पूर्वी लोकांनी कधीही पाहिले नाही असे काहीतरी आम्ही करणार आहोत. 

जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णी व्यक्तीला मिनीयापोलिस शहरातील पोलिस अधिकाऱ्याने 25 मे रोजी पकडले होते. फ्लॉईड याला जमिनीवर पाडून या अधिकाऱ्याने गुडघ्याने त्याची मान दाबून ठेवली होती. यातच जॉर्ज याचा मृत्यू झाला होता. रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर टाकला होता. यावरुन जनतेत मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला होता. याचबरोबर देशातील अनेक राज्यांमध्ये वर्णभेदविरोधी आंदोलन सुरू झाले आहे. काही ठिकाणी या आंदोलाना हिंसक वळण लागल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या वाढच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वाढते आंदोलनाची समस्या अमेरिकेसमोर आहे. 

तुमचे तोंड आधी बंद ठेवा; पोलिस अधिकाऱ्याने ट्रम्प यांना सुनावले 

ट्रम्प यांनी आज घेतलेल्या बैठकीवेळी या वेळी ट्रम्प यांनी सर्व राज्यांच्या गव्हर्नरांना आंदोलन दडपून टाकण्यास सांगितले होते. यावर अॅसिवेडो यांनी ट्रम्प यांना सुनावले होते. याचा व्हिडीओ लिक झाला होता आणि तो व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्यांनी म्हटले होते की,  देशातील सर्व पोलिस प्रमुखांच्या वतीने मी अमेरिकेच्या अध्यक्षांना सांगू इच्छितो की, तुमच्याकडे करण्यासाठी काही भरीव काम नसेल तर, तुमचे तोंड बंद ठेवा. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख