परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनाच उभे केले आरोपीच्या पिंजऱ्यात

सोने तस्करी प्रकरणी केरळमध्ये राजकीय वातावरण तापले असून, मुख्यमंत्री पिनारायी विजयन अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
union minister of state questions role of kerala chief minister in gold smuggling
union minister of state questions role of kerala chief minister in gold smuggling

तिरुअनंतपुरम : सोने तस्करी प्रकरणामुळे केरळमधील राजकीय वातावरण तापले असून, आता परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी भूमिका स्पष्ट करावे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

मुरलीधरन म्हणाले की, तिरुअनंतपुरममध्ये उघडकीस आलेली सोन्याची तस्करी ही गंभीर बाब आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या दूतावासाच्या नावाखाली राजनैतिक साहित्यात ही तस्करी करण्यात आली होती. यामुळे केंद्र सरकारसाठी हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. सरकारने या प्रकरणातील दोषींना शोधण्यासाठी योग्य ती पावले उचलली आहेत. या प्रकरणी अनेक अनुत्तरीत प्रश्न आहेत. याची उत्तरे शोधून राज्य सरकारने ती जनतेला द्यायला हवीत. 

या सर्व प्रकरणात मुख्यमंत्री विजयन यांनी भूमिका स्पष्ट करावी. कारण या प्रकरणातील आरोपी त्यांच्याकडे असलेल्या माहिती तंत्रज्ञान खात्यात नियुक्तीस होती. या आरोपीची सरकारने नेमणूक कोणत्या निकषावर केली होती. मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांचा या प्रकरणात सहभाग आहे. त्यांनी या प्रकरणातील आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याविषयी विधानसभेत खुलासा करावा, असे मुरलीधरन यांना सांगितले. 

या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी करावी, अशी मागणी केरळचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मुल्लपल्ली रामचंद्रन यांनी केली आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांची सहभागाचीही चौकशी करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आणि माहिती तंत्रज्ञान सचिव एम.शिवशंकर यांच्याकडून दोन्ही पदभार काढून घेण्यात आल्याने त्यांच्याकडे संशयाची सुई वळली आहे. 

तिरुअनंतपुरम विमानतळावर तब्बल 30 किलोची सोने तस्करी रविवारी पकडण्यात आली होती. राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सामानामधून ही तस्करी करण्यात आली होती. सीमा शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सरीत कुमार याला तस्करी प्रकरणी अटक केली आहे. तो आधी संयुक्त अरब अमिरातीच्या वाणिज्य दूतावासात जनसंपर्क अधिकारी  होता. या प्रकरणातील दुसरी आरोपी स्वप्ना सुरेश ही फरार आहे.

केरळच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या स्पेस पार्क अँड स्टेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (केएसटीआयएल) या कंपनीची स्वप्ना सुरेश ही कर्मचारी आहे. सोने तस्करीत तिचा सहभाग आढळल्यानंतर तिची हकालपट्टी करण्यात आली आहे. सध्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा कार्यभार मुख्यमंत्री विजयन यांच्याकडे आहे. या मुद्द्यावर काँग्रेसने राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मुल्लपल्ली रामचंद्रन म्हणाले की, सोने तस्करी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा. या प्रकरणातील मुख्यमंत्री विजयन यांच्या सहभागाची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. ही अतिशय मोठी घटना आहे. सोने तस्करीत थेट मुख्यमंत्री कार्यालयाचा सहभाग असण्याची ही पहिलीच घटना आहे. यात एक महिला दोषी आढळली आहे. ती सोने तस्करी करीत असल्याच्या पुरावे समोर आलेले आहेत. या महिलेची नियुक्ती मुख्यमंत्र्यांकडेच असलेल्या माहिती तंत्रज्ञान विभागात करण्यात आली होती. तिची नियुक्ती का करण्यात आली हेच मला समजत नाही. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com