कोरोनावर मात करेल भाबीजींचा पापड; केंद्रीय मंत्र्याने शोधला उपाय

देशभरात कोरोनाचा कहर वाढत असून, कोरोनावरील लशीच्या संशोधनाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, आता भाजप नेते व केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी कोरोनावर मात करणारा पापड शोधल्याने त्याचीच चर्चा सुरू झाली आहे.
union minister arjun ram meghwal claims papad wiil drive away covid19
union minister arjun ram meghwal claims papad wiil drive away covid19

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. मागील चोवीस तासांत देशात सुमारे ५० हजार कोरोना रुग्ण आढळले होते. देशातील कोरोना रुग्णांची संख्या १२ लाखांहून अधिक झालेली असून, आता भाजप नेते व केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी कोरोनावर मात करणारा पापड शोधला आहे. भाबीजी असे या पापडाचे नाव असून, तो खाल्ल्यास कोरोना विषाणू तुमच्यापासून दूर पळेल, असा दावा मेघवाल यांनी केला आहे. याआधी योगगुरु रामदेवबाबा यांनी कोरोनावरील औषध शोधल्याचा दावा करुन स्वत:चे हसे करुन घेतले होते. 

भाबीजी हा पापड मेघवाल यांच्या हस्ते नुकताच सादर करण्यात आला. मेघवाल हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे जलस्त्रोत, नदी विकास आणि गंगा ,पुनरुज्जीवन तसेच, संसदीय कार्य या खात्यांचा कार्यभार आहे. या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात मेघवाल बोलताना दिसत आहेत. ते म्हणत आहेत की, या पापडामुळे कोरोनाच्या विषाणू तुमच्याजवळ येणार नाही, उलट तो तुमच्यापासून दूर पळेल. 

मेघवाल हे राजस्थानमधील बिकानेरचे आहेत. ते व्हिडीओमध्ये भाबीजी पापडचे दोन पॅकेट हातात घेऊन बोलताना दिसत आहेत. ते म्हणत आहेत की, आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत एक पापड उत्पादक हे उत्पादन घेऊन समोर आला आहे. या पापडामुळे तुमच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होऊन तुमचे शरीर कोरोना विषाणूचा प्रतिकार करते. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत एवढे चांगले उत्पादन आणल्याबद्दल या उत्पादकांचे मी अभिनंदन करतो 

भाबीजी पापडचे उत्पादन करणाऱ्या कंपनीनेही पापडात प्रतिकारशक्ती वाढविणारे घटक असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, मेघवाल यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर ते मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले आहेत. पापड कोरोना घालवत असेल तर लशीचे संशोधन करण्यासाठी पैसे कशाला घालवायचे, असा सवाल अनेक नेटकरींनी केला आहे.

याआधी योगगुरु रामदेवबाबा यांनी कोरोनावरील औषध शोधल्याचा दावा करुन ते बाजारात आणले होते. रामदेवबाबाही कोरोनावरील औषधावरुन अखेर तोंडावर पडले होते. त्यांनी नंतर ते औषध सर्दी, खोकला आणि तापासाठी विकण्यास सुरूवात केली होती. आता केंद्रीय मंत्र्याने असे तारे तोडल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com