रिया चक्रवर्ती म्हणाली, सत्यमेव जयते..अंतिम विजय सत्याचाच होईल! - truth shall prevail says rhea chakraborty in sushant singh rajput suicide case | Politics Marathi News - Sarkarnama

रिया चक्रवर्ती म्हणाली, सत्यमेव जयते..अंतिम विजय सत्याचाच होईल!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 जुलै 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या तपासावरुन मोठे वादळ उठले आहे. आता या प्रकरणी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती अडचणीत आली आहे. तिने या प्रकरणी पहिल्यांदाच जाहीर भूमिका घेतली आहे. 

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये मोठे वादळ उठले आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध सुशांतचे पिता के.के. सिंह यांनीच एफआयआर दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. रिया हिने आता या प्रकरणी जाहीरपणे भूमिका मांडली आहे. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असून, मला न्याय मिळेल, असे तिने म्हटले आहे. 

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. यात त्यांनी रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबीयांवर धक्कादायक आरोप केले आहेत. हा एफआयआर दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांचे पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी जमा केलेले पुरावे आणि नोंदविलेले जबाबही बिहार पोलीस तपासत आहेत. 

सुशांतच्या आत्महत्येच्या तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बिहार पोलिसांच्या कार्यपद्धतीला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आक्षेप घेतला होता. आता दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात ईडीनेही उडी घेतली आहे. सुशांतची आत्महत्या, आर्थिक अनियमतिताप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. 

या प्रकरणी रियाने भूमिका स्पष्ट केली आहे. तिने म्हटले आहे की,  माझा देवावर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला न्याय मिळेल, असा मला भरोसा आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये माझ्याबद्दल अतिशय खालच्या पातळीवर बोलले जात आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने याबद्दल न बोलण्याचा सल्ला माझ्या वकिलांनी दिला आहे. सत्यमेव जयते. सत्याचाच विजय होईल. 

सुशांत याने 14 जूनला मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांत याने आत्महत्येचे पाऊल नेमके कशामुळे उचलले याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. त्याच्या आत्महत्येमागे नैराश्याचे अथवा व्यावसायिक शत्रुत्वाचे कारण होते का, याचाही शोध मुंबई पोलीस घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ३९ जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख