अयोध्येत उद्या अवतरणार भव्यदिव्य त्रेतायुग! - tretayug enviornment will be created in ayodhya on bhoomi pujan day | Politics Marathi News - Sarkarnama

अयोध्येत उद्या अवतरणार भव्यदिव्य त्रेतायुग!

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

राम मंदिराचे उद्या अयोध्येत भूमिपूजन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाची जोरदार लगबग अयोध्येत सुरू झाली आहे. 

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत  उद्या (ता.५) होत आहे. या कार्यक्रमाची अयोध्येत लगबग सुरू झाली आहे. हा सोहळा भव्यदिव्य व्हावा यासाठी जय्यत तयारी सुरू असून, उद्या अयोध्येत त्रेतायुग अवतरणार आहे. भगवान राम 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येला परतल्यानंतर त्यांचे ज्या पद्धतीने स्वागत करण्यात आले तसेच वातावरण तयार करण्यात येणार आहे.  

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या भूमिपूजनाचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्सिंगचे बंधन सर्वांनाच पाळावे लागेल. यामुळे कार्यक्रमाला दोनशेपर्यंत व्यक्ती सहभागी होतील. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आदी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्या मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. यानंतर मंदिराचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होईल.  

मागील वर्षी 9 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील जागा राम मंदिराच्या उभारणीसाठी द्यावी, असा आदेश केंद्र सरकारला दिला होता. त्यानंतर या वर्षी 5 फेब्रुवारीला अयोध्येत मंदिराचे बांधकाम करण्यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्यात आल्याची घोषणा 5 फेब्रुवारीला करण्यात आली होती. अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामावर हे ट्रस्ट देखरेख ठेवणार आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या होणाऱ्या कार्यक्रमावेळी सर्वच वातावरण त्रेतायुगातील वाटावे, अशी सजावट करण्यात येणार आहे. याची जबाबदारी डॉ. राममनोहर लोहिया अवध विद्यापीठाच्या 80 विद्यार्थ्यांवर सोपविण्यात आली आहे. भगवान राम 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येला परतल्यानंतर त्यांचे ज्या पद्धतीने स्वागत करण्यात आले तसेच वातावरण तयार करण्यात येणार आहे. या रांगोळ्या रांगोळी, फुले आणि मातीच्या दिव्याच्या माध्यमातून साकारल्या जातील. 

विद्यार्थी तीन ठिकाणी भव्य रांगोळीद्वारे रामायणातील प्रसंग साकारणार आहेत. रामलल्लांच्या नवीन आसनाजवळ स्वस्तिक, ओम, शंख, मयूर, मत्स आणि कलश आदी शुभचिन्हे रांगोळीतून साकारण्यात येणार आहेत. दुसरी रांगोळी भूमिपूजन कार्यक्रमावेळी पंतप्रधान मोदी भाषण करणार आहेत त्या मंचासमोर असेल. या रांगोळीची मध्यवर्ती कल्पना मातीच्या दिव्याप्रमाणे असेल. तिसरी रांगोळी भूमिपूजनाच्या स्थळी काढण्यात येणार आहे. यात 'भये प्रगट कृपाला' हे वचन रांगोळीतून साकारलेले असेल. याच्या विरुद्ध दिशेला रांगोळीतून जय श्री राम असे रेखाटले जाईल. प्रत्यक्ष भूमिपूजन होणाऱ्या जागा पादुकांची रांगोळी असेल. या रांगोळ्यांचा मुख्य उद्देश हा त्रेतायुगातील वातावरण तयार करणे हा आहे.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख