tiktok and other chinese apps ban will cost thousand of jobs in india | Sarkarnama

टिकटॉकसह चिनी अॅप्सवर बंदीने हजारो रोजगार धोक्यात

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जून 2020

सरकारने 59 चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यामुळे हजारो लोकांचा रोजगार धोक्यात आला आहे. 

नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या सैन्यात पूर्व लडाखमध्ये गल्वान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. यानंतर भारत आणि चीनमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लोकप्रिय असलेल्या टिकटॉक आणि यूसी ब्राऊजरसह 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. यातील अनेक अॅप्सची कार्यालये भारतात आहेत. तेथे काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर यामुळे गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

चिनी अॅप देशाच्या सार्वभौमतेला आणि एकात्मतेला धोका निर्माण करीत आहेत. याचबरोबर ते देशात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करीत आहेत. यामुळे अशा चिनी अॅपवर बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती व दूरसंचार मंत्रालयाने दिली होती. सरकारने बंदी घातलेली अनेक अॅप्स भारतात लोकप्रिय आहेत. यातील विशेषत: टिकटॉकचे भारतात दहा कोटीहून अधिक अॅक्टिव्ह यूजर आहेत. याचबरोबर सोशल मीडियावर हेलो, लाईकी याचबरोबर व्हिडिओ चॅट अॅप बिगो लाईव्ह ही अॅप्स भारतात अतिशय लोकप्रिय आहेत. विशेषत इंग्रजी भाषेचा फारसा संबंध नसलेल्या वर्गात या अॅप्सचा वापर खूप अधिक आहे. 

अनेक अॅप्सवर देशातील कोट्यवधी क्रिएटर कंटेट तयार करून टाकतात. त्यातून अनेक जणांना पैसे मिळत आहेत. याच पैशावर अनेक जणांची रोजीरोटी सुरू आहे. याचबरोबर अनेक अॅप्सची कार्यालये भारतात आहेत. या कार्यालयांमध्ये हजारो भारतीय कर्मचारी काम करीत आहेत. त्यांचे काय होणार, याबद्दल अद्याप सरकारी पातळीवर स्पष्टता नाही. मात्र, या हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. याचबरोबर अनेक अॅप्सवर सक्रिय असणारे कोट्यवधी क्रिएटरही कमाईल मुकणार आहेत. 

सरकारने आता या अॅप्सवर बंदी घातली असून, त्याची कार्यवाही होण्यास काही कालावधी लागणार आहे. मंत्रालयाने अॅप्सवर घातलेल्या बंदीचे पालन इंटरनेट सेवा पुरवठादार कंपन्यां करतील. याबाबत या कंपन्यांना आदेश दिले जातात. इंटरनेट सेवा पुरवठादार कंपन्यांनी या या आदेशाचे पालन केल्यानंतर ही अॅप्स वापरणाऱ्या ग्राहकांना या अॅप्सच्या वापरावर निर्बंध घालण्यात आल्याचा संदेश येतो. 

आता या बंदीचा सर्वाधिक फटका टिकटॉक आणि यूसी न्यूज या अॅप्सना बसेल. कारण हे अॅप्स लाईव्ह फीड वापरतात. त्यामुळे त्यांच्या वापरावर निर्बंध येतील. परंतु, वापरासाठी इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता नसलेली अॅप्स वापरता येतील. परंतु, ही अॅप्स गुगलचे प्ले स्टोअर आणि अॅपलच्या अॅप स्टोअरमधून हटविली जातील. त्यामुळे ती नव्याने डाऊनलोड करणे शक्य होणार नाही. 

गल्वान खोऱ्यातील संघर्षानंतर चीनच्या वस्तूंवर बंदी घालण्याची मागणी होत होती. याचबरोबर  चिनी अॅप्सवर बहिष्कार घालण्याची मागणीही जोर धरत होती. तसेच, केंद्र सरकारने अनेक चिनी कंपन्यांकडून पीएमकेअर्स फंडासाठी देणग्या घेतल्याचे समोर आले होते. यावरुन काँग्रेसने मोदी सरकारला लक्ष्य केले होते.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख