thousand hd movies can be downloaded within few seconds | Sarkarnama

होय, हजार एचडी चित्रपट काही सेकंदात डाउनलोड

वृत्तसंस्था
शनिवार, 23 मे 2020

लॉकडाउनमुळे अनेक वेळा आपण इंटरनेटचा स्पीड कमी झालेला पाहतो. मात्र, ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी केलेल्या चाचणीतून इंटरनेटचा अविश्वसनीय असा वेग समोर आला आहे. 

मेलबर्न : इंटरनेट स्पीडच्या बाबतीत संशोधकांनी कल्पनातीत वेग साध्य केला असून, तब्बल एक हजार एचडी चित्रपट काही सेकंदंमध्ये डाऊनलोड होऊ शकतात. हा स्पीड आहे प्रतिसेकंद ४४.२ टेराबाईट्स असून, तो ऑस्ट्रेलियातील मोनाश, स्वीनबर्न आणि आरएमआयटी या विद्यापीठांच्या संशोधकांनी साध्य केला. मोनाशचे डॉ. बील कॉरकॉरन, आरएमआयटीचे प्रा. अर्नान मिचेल व स्वीनबर्नचे प्रा. डेव्हिड मॉस यांनी मेलबर्न शहरात ७६.६ किलोमीटरची डार्क ऑप्टिकल फायबर्स बसवून नेटवर्कची चाचणी (लोड-टेस्ट) घेतली. 

नेचर कम्युनिकेशन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यास गटाच्या संशोधनानुसार, डेटा ऑप्टीक्स आणि टेलिकम्युनिकेशन्स क्षेत्रात यामुळे क्रांतिकारी बदल होऊ शकतो. ऑस्ट्रेलियातील टेलिकम्युनिकेशन्स नेटवर्क वेगवान करण्याबरोबरच मागणी वाढणाऱ्या कालावधीत लाखो घरांमधील हाय-स्पीड इंटरनेट कनेक्शनला पाठबळ देण्याची क्षमताही त्यात आहे. 

इतका अतुलनीय वेग साध्य करण्यासाठी संशोधकांनी ८० लेसर्सच्या जागी एका वस्तुच्या रुपातील मायक्रो-कॉम्ब हे साहित्य वापरले. सध्याच्या टेलिकम्युनिकेशन्स हार्डवेअरपेक्षा ते बरेच लहान व हलके असते. प्रयोगशाळेबाहेर मायक्रो-कॉम्ब बसविण्यात आले. त्यासाठी सध्याच्याच पायाभूत सुविधांचा वापर करण्यात आला. ऑस्ट्रेलियातील नॅशनल ब्रॉडबँड नेटवर्क याच सुविधांचा वापर करते. विशेष म्हणजे फिल्ड ट्रायलसाठी मायक्रो-कॉम्बचा प्रथमच वापर झाला. प्रत्येक चॅनेलमधून ४टीएचझेड बँडविड्थ क्षमतेनुसार कमाल इंटरनेट वापर होऊ शकतो हे दिसून आले. 

 

 

२५ वर्षांनंतरचे चित्र 

सध्या कोरोनामुळे जवळपास जगभर लॉकडाउन असल्याने इंटरनेटवर कमालीचा ताण पडला आहे. अशावेळी हे संशोधन बहुमोल ठरते. २५ वर्षांनंतर कसे चित्र असेल याची झलक यातून मिळते. 

आपण जमिनीत यापूर्वीच ज्या फायबर बसविल्या आहेत, त्याची क्षमता या संशोधनातून प्रदर्शित होते. याबद्दल ऑस्ट्रेलियन वाहिनीचे प्रकल्पाबद्दल आभार मानावे लागतील. सध्याच्या व भविष्यातील कम्युनिकेशन नेटवर्कचा तो कणा असेल. भविष्यातील गरजेची पूर्तता करू शकेल असे काहीतरी आम्ही विकसित केले आहे. 
- डॉ. बील कॉरकॉरन 

 

मायक्रो-कॉम्बचे संशोधन हा एक प्रचंड महत्त्वाचा पल्ला आहे. बँडविड्थच्या जगात सतत वाढणाऱ्या ज मागणीची आपण पुर्तता करू शकतो अशी आश्वासक स्थिती त्यामुळे निर्माण झाली आहे. 
- प्रा. डेव्हिड मॉस 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख