राजभवनातील 84 कर्मचारी पॉझिटिव्ह सापडल्यानंतर राज्यपालांनाही कोरोनाची लागण - Tamil Nadu Governor Banwarilal Purohit tested positive for COVID19 | Politics Marathi News - Sarkarnama

राजभवनातील 84 कर्मचारी पॉझिटिव्ह सापडल्यानंतर राज्यपालांनाही कोरोनाची लागण

वृत्तसंस्था
रविवार, 2 ऑगस्ट 2020

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशात दररोज 50 हजारहून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे.  

चेन्नई : देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे. तमिळनाडूतही कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. तमिळनाडूच्या राजभवनातील तब्बल 84 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले होते. आता राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्याच कोरोनाची लक्षणे दिसून आलेली नाहीत. डॉक्टरांनी त्यांना निवासस्थानीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे. कावेरी रुग्णालयातील पथक राज्यपालांच्या प्रकृतीवर कायम लक्ष ठेवून आहे. खासगी मदतनिसाला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुरोहित हे चार दिवसांपासून एकांतवासात राहत होते. 

राज्यपालांनी येथील खासगी रुग्णालयाच कोरोनाची चाचणी केली होती. यानंतर त्यांना कोरोनाचे निदान झाले असल्याचे समोर आले. राजभवनातील 84 कर्मचाऱ्यांना आधी कोरोनाची लागण झाली होती. यात सुरक्षा कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. 

 

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वतः अमित शहा यांनीच ट्विट करुन ही माहिती दिली आहे. शहा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आपल्याला कोरोनाची सुरुवातीची लक्षणे आढळल्याने तपासणी करुन घेतली असता लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. माझी प्रकृती चांगली असून वैद्यकीय सल्ल्यानुसार मी रुग्णालयात दाखल होत आहे, असे शहा यांनी म्हटले आहे. 

गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी विलिगीकरण करुन घेऊन तपासणी करुन घ्यावी, असा सल्ला शहा यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांत अमित शहा यांनी अनेक बैठका घेतल्या आहेत. दिल्लीच्या कोरोना संकटातही ते सतत कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेले चिंतेत पडले आहे. दुसरीकडे महानायक अमिताभ बच्चन यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली असून, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती त्यांचे पुत्र अभिषेक बच्चन यांनी दिली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख