काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सुशीलकुमार शिंदेंच्या नांवाची चर्चा - Sushil Kumar Shinde's Name for Congress President Post | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सुशीलकुमार शिंदेंच्या नांवाची चर्चा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातील वरिष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या नांवाची चर्चा सुरु झाली आहे. त्यांच्याकडे अध्यक्षपद सोपवून कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रियंका गांधी-वड्रा काम पाहतील अशीही चर्चा आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची नेतृत्वाबद्दलची नाराजी दूर करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या असून आज दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होत आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातील वरिष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या नांवाची चर्चा सुरु झाली आहे. त्यांच्याकडे अध्यक्षपद सोपवून कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रियंका गांधी-वड्रा काम पाहतील अशीही चर्चा आहे.

निवडणूकीतील अपयशानंतर राहूल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला. शेवटी सोनिया गांधी यांनाच पुन्हा कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम सुरू करावे लागले. पक्षाला अद्याप पुर्णवेळ अध्यक्ष न मिळाल्याने काही नेत्यांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. सतत बैठका होऊनही कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होत नाही. त्यामुळे पक्षांतर्गत मरगळ दिसून येत आहे. 

काही महिन्यांपुर्वी पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे पत्र पक्षातील २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिले होते. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखाली कपिल सिब्बल, आनंद शर्मा, पृथ्वीराज चव्हाण आदी नेत्यांचा त्यामध्ये समावेश होता. या पत्राने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आले. त्यानंतर पक्षाची तातडीची बैठक घेऊन या नेत्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. या नेत्यांचे समाधान झाल्याचा दावा अन्य नेत्यांकडून करण्यात आला होता. पण त्यानंतरही पक्ष नेतृत्वामध्ये बदल झाला नाही. काही नेत्यांनी सोनिया गांधी यांच्यावरच विश्वास व्यक्त केला. तर एका गटाने राहुल गांधींनाच पुन्हा अध्यक्ष करण्याबाबत मत व्यक्त केले होते. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख