उद्धव ठाकरे तपास सीबीआयकडे का देत नाहीत ? भाजप मंत्र्याचा सवाल  - #SushantSinghRajput case Why Uddhav Thackeray does not hand over investigation to CBI? Question of BJP Minister | Politics Marathi News - Sarkarnama

उद्धव ठाकरे तपास सीबीआयकडे का देत नाहीत ? भाजप मंत्र्याचा सवाल 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 ऑगस्ट 2020

आर.के. सिंह यांनी आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे, की या प्रकरणात आतापर्यंत मुंबई पोलिसांनी ठोस असे काहीच केलेले नाही.

मुंबई : सुशांतसिंह रजपूत आत्महत्याप्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे पण, ते राजी नाहीत. जर खऱ्या अर्थाने सुशांतसिंह यांच्या कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर हे प्रकरण सीबीआयकडे देण्याशिवाय पर्याय नाही असे भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री आर.के.सिंह यांनी म्हटले आहे. 

सुशांतच्या आत्महत्येनंतर गेल्या महिन्या दीड महिन्यापासून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. त्याच्या वडीलांनी अभिनेत्री आणि सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात एफआयआर दाखल केले आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्‍न पुढे आले आहे. बॉलिवूडमधील घराणेशाही होतकरू अभिनेते आणि अभिनेत्रींना पुढे येऊ देत नाहीत. त्यांचा छळ केला जातो असा आरोप अभिनेत्री कंगणा राणावत हिनेही केला होता. आता सुशांतच्या आत्महत्येचा मुद्दा बिहारमध्ये राजकीय बनला असून राष्ट्रीयस्तरावरही हे प्रकरण गाजत आहे. 

बिहारमधील जवळजवळ सर्वच पक्षांनी सुशांतच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली आहे. आता भाजपही मागे नाही. या पक्षाचे राज्यातील आणि केंद्रातील नेते या प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य करीत आहे. केंद्रीय मंत्री आर. के.सिंह यांनी ट्विट करून सुशातच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली आहे. तशी मागणी करताना त्यांनी थेट मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावरच टीका केली आहे. 

आर.के. सिंह यांनी आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे, की या प्रकरणात आतापर्यंत मुंबई पोलिसांनी ठोस असे काहीच केलेले नाही. ज्या लोकांचा तपास केला तो ही प्रसिद्धीसाठी होता. आतापर्यंत पोलिसांनी एफआयआरही दाखल केले नाही आणि नेमके या प्रकरणाचा तपास कोण करीत आहेत हे स्पष्ट केलेले नाही. आता पाटनात सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी एफआयआर दाखल झाला आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी लोकच करीत असताना तो का दिला जात नाही असा सवाल करून सिंह म्हणाले, की मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे की त्यांनी हे प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा. मात्र ते राजी दिसत नाहीत. 

दरम्यान, सुशांत जे मोबाईल वापरत होता त्यापैकी एक सिम कार्ड सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी याच्या नावावर असल्याचे समजते. आता बिहार पोलीस कॉल डिटेल्सची माहिती घेत आहेत. काही असले तरी सुशांत आत्महत्याप्रकरण विशेषत: बिहारमध्ये गाजत आहे. या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले असून सर्वच पक्षाचे नेते न्याय देण्याची भाषा करीत आहेत. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख