धक्कादायक : मुंबई पोलीस दलातूनच होतेय रिया चक्रवर्तीला मदत... - sushants family lawyer alleged mumbai police connection with rhea chakraborty | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक : मुंबई पोलीस दलातूनच होतेय रिया चक्रवर्तीला मदत...

वृत्तसंस्था
बुधवार, 29 जुलै 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये मोठे वादळ उठले आहे. घराणेशाहीसह इतर मुद्दे समोर आले असून, यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. आता सुशांतच्या वडिलांच्या एफआयआरमुळे या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. 

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये वादळ उठले आहे. सुशांतच्या आत्महत्येची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध सुशांतचे पिता के.के. सिंह यांनीच एफआयआर दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासाबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याचवेळी सुशांतच्या कुटुंबीयांच्या वकिलाने मुंबई पोलिसांवर धक्कादायक आरोप केले आहेत. 

सुशांत याने आत्महत्येचे पाऊल नेमके कशामुळे उचलले याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. त्याच्या आत्महत्येमागे नैराश्याचे अथवा व्यावसायिक शत्रुत्वाचे कारण होते का, याचाही शोध मुंबई पोलीस घेत आहेत. सुशांत याने 14 जूनला मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ३९ जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे.  

सुशांतवर उपचार करणारे मानसोपचारतज्ञ डॉ.केर्सी चावडा यांचाही जबाब पोलिसांनी नोंदविला होता. सुशांतवरील वैद्यकीय उपचाराबाबत माहिती घेण्यासाठी ही चौकशी करण्यात आली होती. त्याची मानसिक स्थिती आणि औषधोपचार याचीही माहिती घेण्यात आली होती. दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) करावा, अशी मागणी रिया चक्रवर्ती हिने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती. मात्र, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची शक्यता फेटाळून लावली होती.

सुशांतच्या कुटंबीयांचे वकील विकाससिंह आहेत. माजी अतिरिक्त सॉलिसीटर जनरल असलेल्या विकाससिंह यांनी मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंबई पोलीस दलातील कोणीतरी रिया चक्रवर्तीला मदत करीत आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. याचबरोबर मुंबई पोलिसांचा तपास दुसऱ्याच दिशेने जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

बिहारमधून एफआयआर महाराष्ट्रात वर्ग करण्यासाठी रियाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याविषयी बोलताना विकाससिंह म्हणाले की, बिहारमधील एफआयआर मुंबई पोलिसांकडे वर्ग करावा, असे रिया म्हणत असेल तर मुंबई पोलिसांमधील कोणीतरी तिला मदत करीत असल्याशिवाय ती असे म्हणणार नाही. यापेक्षा दुसरा कोणता मोठा पुरावा हवा. आतापर्यंत रिया सीबीआयकडे तपास द्यावा, अशी मागणी करीत होती. आता मात्र, तिने बिहारमधील तपास थांबविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ती सर्वोच्च न्यायालयात गेलीच आहे तर तिने सीबीआय चौकशीची मागणी करायला हवी. 

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी नुकताच ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट यांचा जबाब नोंदविला आहे. याचबरोबर धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला असून, सुशांतने धर्मा प्रॉडक्शनसोबत शेवटी केलेल्या ड्राईव्ह या चित्रपटाच्या कराराची प्रतही त्यांनी पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी यशराज फिल्म्सचे (वायआरएफ) आदित्य चोप्रा आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचीही पोलिसांनी नुकतीच चौकशी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३९ जणांचे जबाब नोंदविले आहेत. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा मॅरेथॉन तपास सुरू आहे. आगामी काळात आणखी काही जणांचे जबाब नोंदविण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख