अंकिता लोखंडे म्हणतेय, सुशांत आत्महत्या करणारांपैकी नव्हता! - sushant singh rajput was not a guy who will commit suicide says ankita lokhande | Politics Marathi News - Sarkarnama

अंकिता लोखंडे म्हणतेय, सुशांत आत्महत्या करणारांपैकी नव्हता!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 जुलै 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या तपासावरुन मोठे वादळ उठले आहे. आता सुशांतची पूर्वाश्रमीची मैत्रीण अंकिता लोखंडे हिने पहिल्यांदाच याविषयी जाहीर भूमिका मांडली आहे. 
 

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये मोठे वादळ उठले आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध सुशांतचे पिता के.के. सिंह यांनीच एफआयआर दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. सुशांतची पूर्वाश्रमीची मैत्रीण अंकिता लोखंडे हिने आता पहिल्यांदाच भूमिका जाहीर घेतली आहे. या प्रकरणी तिने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. यात त्यांनी रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबीयांवर धक्कादायक आरोप केले आहेत. हा एफआयआर दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांचे पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी जमा केलेले पुरावे आणि नोंदविलेले जबाबही बिहार पोलीस तपासत आहेत. 

सुशांतच्या आत्महत्येच्या तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बिहार पोलिसांच्या कार्यपद्धतीला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आक्षेप घेतला होता. आता दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात ईडीनेही उडी घेतली आहे.  

अंकिता हिने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. पवित्र रिश्ता मालिकेच्या सेटवर सुशांत आणि अंकिता पहिल्यांदा भेटले होते. तेव्हापासून 2016 पर्यंत सुमारे सहा वर्षे ते एकत्र होते. सुशांत नैराश्यातून आत्महत्या करेल हे विश्वास बसण्यासारखे नाही, असा दावा तिने केला आहे. तिने म्हटले आहे की, सुशांतने आत्महत्या केल्याची बातमी आली  त्यावेळी त्यावर विश्वास बसण्यासाठी मला काही वेळ लागला. तो अतिशय आनंदी असायचा. नैराश्यातून आत्महत्या करेल, असा तो नव्हता. सुशांत आणि मी अनेक कठीण प्रसंगातून गेलो होतो. मात्र, तो कधीही नैराश्यग्रस्त झाला नव्हता.

सुशांत याने 14 जूनला मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांत याने आत्महत्येचे पाऊल नेमके कशामुळे उचलले याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. त्याच्या आत्महत्येमागे नैराश्याचे अथवा व्यावसायिक शत्रुत्वाचे कारण होते का, याचाही शोध मुंबई पोलीस घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ३९ जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख