सुशांतच्या आत्महत्येवरुन बिहार विधानसभेसह विधानपरिषदही तापली!

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये मोठे वादळ उठले होते. आता या प्रकरणाच्या तपासावरून मोठा गदारोळ उडाला आहे. या तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकारमध्ये संघर्ष सुरू झाला आहे.
sushant singh rajput matter raised in bihar legislative assembly and legislative council
sushant singh rajput matter raised in bihar legislative assembly and legislative council

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये मोठे वादळ उठले आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध सुशांतचे पिता के.के. सिंह यांनीच एफआयआर दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणाला बिहारमध्ये राजकीय रंग दिला जात असून, सर्वच राजकीय पक्ष आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या यात उडी घेत आहेत. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशीच्या मागणीवरुन आज बिहारच्या विधानसभेसह विधान परिषदेतील वातावरण तापले. 

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. यात त्यांनी रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबीयांवर धक्कादायक आरोप केले आहेत. हा एफआयआर दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांचे पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी जमा केलेले पुरावे आणि नोंदविलेले जबाबही बिहार पोलीस तपासत आहेत. 

सुशांतच्या आत्महत्येच्या तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बिहार पोलिसांच्या कार्यपद्धतीला महाराष्ट्र सरकारने आक्षेप घेतला आहे. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात सक्त वसुली संचालनालयानेही (ईडी) उडी घेतली आहे. सुशांतची आत्महत्या, आर्थिक अनियमतिताप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. 

सुशांतचे नातेवाईक असलेले भाजपचे आमदार नीरज कुमार सिंह यांनी सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी बिहार विधानसभेत केली. याला राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनीही पाठिंबा दिला. विधानसभेनंतर विधान परिषदेतही हा मुद्दा उपस्थित झाला. नीरज कुमार सिंह यांच्या पत्नी नूतन सिंह या विधान परिषदेच्या आमदार आहेत. त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्र पोलीस या प्रकरणी तपास केल्याची औपचारिकता पूर्ण करीत आहेत, असा आरोपही या वेळी करण्यात आला. 

सुशांत याने 14 जूनला मुंबईतील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याने आत्महत्येचे पाऊल नेमके कशामुळे उचलले याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. त्याच्या आत्महत्येमागे नैराश्याचे अथवा व्यावसायिक शत्रुत्वाचे कारण होते का, याचाही शोध मुंबई पोलीस घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com