परमबीर सिंग यांना धक्का : देशमुखांविरोधातील याचिकेच्या सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार - Supreme Court Denies Hearing of Parambir Singh Pitition | Politics Marathi News - Sarkarnama

परमबीर सिंग यांना धक्का : देशमुखांविरोधातील याचिकेच्या सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 24 मार्च 2021

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. त्यांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. त्यांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. (Supreme Court Denies Hearing of Parambir Singh Pitition)

राज्य सरकारने बदली केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या परमबीरसिंग (Parambir Singh) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले होते. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) सचिन वाझेंना प्रत्येक महिन्याला १००  कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते. अनिल देशमुखांनी वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर अस्थापनांकडून एकूण शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते. मागील काही महिन्यांत वाझेंना गृहमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी अनेक वेळा बोलावले होते. या भेटींमध्ये ते वाझेंना (Sachin Waze) निधी गोळा करण्यासाठी सांगत, असे आरोप परमबीर सिंग यांनी या पत्रात केले होते. 

त्यानंतर परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात  याचिका दाखल केली. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आपण जे आरोप केले आहेत, त्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी सिंह यांनी या याचिकेद्वारे केली होती. या याचिकेत आपण केलेल्या सर्व आरोपांची चौकशी करावी, त्यासाठी सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात यावेत, अशी मागणी केली होती. १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट देशमुख यांनी वाझे यांना दिल्याचा लेटरबाँब परमबीर सिंह यांनी नुकताच टाकला असून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच याबाबत पत्र लिहिले. या प्रकारानंतर परमबीर यांनी केलेल्या आरोपांचे खंडन राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत असून परमबीर सिंह यांच्या उद्देशाबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. माझे आरोप खोटे असतील तर देशमुखांच्या घरातील सीसीटीव्ही तपासा, असे परमबीर सिंह यांनी याचिकेत म्हटले आहे. (Supreme Court Denies Hearing of Parambir Singh Pitition)

आज सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी यांनी परमबीर सिंग यांची बाजू मांडली. मात्र, न्यायालयाने ही सुनावणी घेण्यास नकार दिला. हे प्रकरण मुंबईतले असल्याने तुम्ही मुंबई उच्च न्यायालयात का गेला नाहीत, असा सवाल न्यायालयाने उपस्थित करत परमबीर सिंग यांना उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. आपण आजच उच्च न्यायालयात अर्ज करणार असल्याचे रोहतगी यांनी सांगितले.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख