sonia gandhi given power to sachin pilot at very young age says congress | Sarkarnama

पायलट यांना तरुणपणात एवढी मोठी संधी देऊनही उपयोग झाला नाही...

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 14 जुलै 2020

राजस्थानमधील राजकीय वादळ अखेर शमले असून, कोणत्याही चर्चेला सचिन पायलट बधत नसल्याचे पाहून अखेर पक्षाने त्यांची प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी केली आहे. 

भोपाळ : राजस्थानातील काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांची पक्षाने उपमुख्यमंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे. पायलट यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात थेट बंडाचे निशाण उभारले होते. सोनिया गांधींच्या कृपाशीर्वादाने पायलट यांना तरुणपणी एवढी मोठी राजकीय संधी मिळाली होती, असेही पक्षाने म्हटले आहे. पायलट यांचे बंड अखेर चहाच्या पेल्यातील वादळ ठरल्याचे चित्र आहे. 

सचिन पायलट यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून आणि उपमुख्यमंत्रिपदावरुन हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली. पायलट यांच्याकडील सर्व खाती काढून घेण्यात आल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात सत्तासंघर्ष सुरू होता. पायलट दोन दिवस दिल्लीत जाऊन बसले होते. त्यांनी प्रियंका गांधी किंवा राहुल गांधीशी चर्चा केल्याचे वृत्त होते पण, त्याबाबतही अधिकृत दुजोरा कोणी दिला नाही. गेहलोत यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर करून पायलट यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यांनी आतापर्यंत तसा तीनवेळा प्रयत्न केला पण, त्यांना यश आले नव्हते.  

राजस्थान विधिमंडळ काँग्रेस पक्षाची बैठक आज जयपूर येथील हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीला पक्षाचे 102 आमदार बैठकीत उपस्थित असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. पक्षविरोधी कारवाया करणारे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी बैठकीत आमदारांनी केली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी पायलट यांना पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती केली होती मात्र, ते उपस्थित राहिले नाहीत. पायलट यांचे बंड मोडून काढण्याचे शेवटी पक्षाने ठरविले आहे. सुरजेवाला यांनी पायलट यांची उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे, असे जाहीर केले. 

या वेळी सुरजेवाला म्हणाले की, सचिन पायलट यांच्याविषयी सर्वांनाच प्रेम होते. त्यांना सोनिया गांधीचे आशीर्वाद होते. या आशीर्वादामुळेच त्यांना अगदी तरुण वयात मोठी राजकीय संधी मिळाली. असे असतानाही पायलट आणि त्यांचे समर्थक मंत्री हे भाजपच्या कटात सहभागी होऊन राज्यातील काँग्रेसचे सरकार उलथवण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला काल सुमारे 90 आमदार हजर होते. ही बैठक गेहलोत यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीतून बाहेर पडताना पक्षाचे आमदार विजयाची खूण करीत होते. त्यामुळे गेहलोत यांनी शक्तिप्रदर्शन करुन पक्षश्रेष्ठींवर दबाव आणल्याचे चित्र होते. या वेळी पक्षाने पाठविलेले केंद्रीय निरीक्षक रणदीप सुरजेवाला आणि अजय माकन हेही उपस्थित होते. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख