भारत देणार चीनला दणका; आणखी एका डिजिटल स्ट्राईकच्या तयारीत

गल्वान खोऱ्यात झालेल्या संघर्षापासून भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. चीनला धडा शिकवण्यासाठी भारत आता आणखी एक डिजिटल स्ट्राईक करण्याच्या तयारीत आहे.
some chinese apps on government radar due to national security reason
some chinese apps on government radar due to national security reason

नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या सैन्यात पूर्व लडाखमध्ये गल्वान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. यानंतर चीनसोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने टिकटॉक अॅप आणि यूसी ब्राऊजरसह 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. नंतर या अॅप्सनी सुरू केलेल्या क्लोन अॅप्सवरही भारताने बंदी घातली होती. भारत आता चीनवर आणखी एक डिजिटल स्ट्राईक करण्याच्या तयारीत आहे.

भारताने  सुरुवातीला टिकटॉकसह 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. चिनी अॅप देशाच्या सार्वभौमतेला आणि एकात्मतेला धोका निर्माण करीत आहेत. याचबरोबर ते देशात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करीत आहेत. यामुळे अशा चिनी अॅपवर बंदी घालण्यात आली आहे, असे भारताच्या केंद्रीय माहिती व दूरसंचार मंत्रालयाने म्हटले होते. 

बंदी घातलेली अॅप्सनी त्यांची क्लोन अॅप्स आणली होती. यात टिकटॉक लाइटस हेलो लाइट, शेयर इट लाइट आणि बिगो लाईव्ह यासह अनेक अॅप्सनी अशी क्लोन अॅप्स आणली होती. अशा प्रकारची ४७ अॅप्स आता आढळली असून, त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. यामुळे भारताने बंदी घातलेल्या एकूण चिनी अॅप्सची संख्या १०६ झाली. भारताने या बंदी घातलेल्या अॅप्सची यादी अद्याप जाहीर केलेली नव्हती. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने आता 275 अॅप्सची यादी तयार केली आहे. या अॅप्सकडून राष्ट्रीय सुरक्षा आणि यूजरच्या खासगीपणाबाबतच्या नियमांचे उल्लंघन केले आहे का याची तपासणी करण्यात येत आहे. यात चीनच्या टेनेसेंट कंपनीचे पबजी, शाओमी कंपनीचे झिली, अलिबाबा कंपनीचे अलिएक्स्प्रेस, टिकटॉकसारखे यूलाईक या मोठ्या अॅप्सचाही समावेश आहे. 

चिनी अॅप्स आणि त्यांना मिळणारा निधी याची तपासणी करण्यात येत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आता काही अॅप्स सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आली आहेत. याचबरोबर चिनी अॅप्सना भारतात डेटा ठेवण्याची अट आहे. याचेही उल्लंघन या अॅप्सकडून होत आहे का याचाही शोध घेतला जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

भारत सरकारने घातलेली बंदी ही माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील कलम 69 अ अंतर्गत घातली आहे. या कलमानुसार सरकारला देशाची सुरक्षा, एकात्मता याला धोका निर्माण करणाऱ्या संगणकीय स्त्रोतांवर बंदी घालता येते. याचबरोबर त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला जाऊ शकतो. टिकटॉकने म्हटल्याप्रमाणे सरकारने चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय हंगामी असेल तर, त्यावर फेरविचार होऊ शकतो. यामुळे टिकटॉकसह इतर 59 अॅप्सवरील बंदी तात्पुरती की कायमस्वरुपी याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com