कर्नाटकच्या 'त्या' मंत्र्यांना न्यायालयाचा दिलासा

रमेश जारकीहोळी सीडी प्रकरणानंतर राज्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जारकीहोळी यांच्याविरुध्द तक्रार दाखल करणारे सामाजिक कार्यकर्ते दिनेश कल्लहळ्ळी यांनी आणखी काही प्रभावी नेत्यांच्या सीडी आपल्याकडे असल्याचे सांगून त्या लवकरच प्रसारित करणार असल्याचे सांगितले आहे
Ramesh Jarkiholi
Ramesh Jarkiholi

बंगळूर  : रमेश जारकीहोळी सीडी प्रकरणानंतर राज्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जारकीहोळी यांच्याविरुध्द तक्रार दाखल करणारे सामाजिक कार्यकर्ते दिनेश कल्लहळ्ळी यांनी आणखी काही प्रभावी नेत्यांच्या सीडी आपल्याकडे असल्याचे सांगून त्या लवकरच प्रसारित करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अनेक राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. चक्क सहा मंत्र्यांनीच अशा प्रकारचे बदनामीकारक वृत्त प्रसारमाध्यमांनी देऊ नये, यासाठी चक्क न्यायालयात धाव घेतली.

दरम्यान, या मंत्र्यांच्या याचिकेची सुनावणी करून बंगळूर शहर दिवाणी न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. ३० मार्चपर्यंत त्यांच्या संदर्भात कोणतीही मानहानी करणारे वृत्त माध्यमांतून प्रसिध्द करण्यास न्यायालयाने स्थगिती दिली. शहर दिवाणी न्यायालयाचे (सीसीएच २०) न्यायाधीश बी. एस. विजयकुमार यांच्या न्यायपीठाने मंत्र्यांची याचिका मान्य केली. राज्यातील कोणत्याही प्रसारमाध्यमांनी या सहा मंत्र्यांची मानहानी करणारे वृत्त देऊ नये, यासाठी मध्यावधी स्थगिती दिली. याचिकेची पुढील सुनावणी ३० मार्चला होणार आहे.

आपल्याविरुध्द बदनामीकारक वृत्त माध्यमांनी देऊ नये, अशी विनवणी करण्यासाठी सहा मंत्री न्यायालयात गेले होते. त्यामुळे राजकीय क्षेत्रात उलट-सुलट सुरू झाली आहे. मंत्री डॉ. के. सुधाकर, एस. टी. सोमशेखर, भैरती बसवराजू, शिवाराम हेब्बार, के. सी. नारायणगौडा, बी. सी. पाटील यांनी शुक्रवारी शहरातील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली. मीडियाला आपल्याविरूद्ध मानहानीचा अहवाल प्रसिद्ध करण्यापासून मनाई करावी, अशी त्यांची मागणी होती. मंत्र्यांच्या या निर्णयावरून भाजपमध्येही उलट-सुलट विचार व्यक्त होत आहेत.

मुंबईतील घडामोडी सांगू : सोमशेखर
सहकारमंत्री एस. टी. सोमशेखर म्हणाले, आम्ही कोणत्या भीतीने न्यायालयात जात नाही. राजकीय चाचेगिरीचे लक्ष्य होऊ नये यासाठी आम्ही याचिका दाखल केली आहे. आमच्या अपमानास्पद बातम्या प्रसारित झाल्या तर काय होईल. अशी बदनामी रोखण्यासाठी आम्ही न्यायालयात अर्ज केला आहे. कोणीही काहीही तयार करून ब्लॅकमेल करीत आहे. लवकरच आम्ही मुंबईला गेलेले १५ जण संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहोत. आम्ही मुंबईत काय केले, जे घडले त्याविषयी आम्ही राज्यातील जनतेला माहिती देऊ.

तंत्रज्ञानाचा गैरवापर : भैरती
बदनामीकारक अहवालातून आमची मानहानी होत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून काहीही करता येते. म्हणून आम्ही न्यायालयात अर्ज केला आहे. आमच्याविरूद्ध काहीही होऊ शकते. आम्ही राजकीय जीवनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी न्यायालयात गेलो आहोत. आम्ही हात आणि तोंड स्वच्छ ठेऊन मंत्री म्हणून कार्य करीत आहोत. आमच्या वेगाला रोखण्यासाठी षडयंत्र आखण्यात येत आहे. सत्यता उघड होण्यापूर्वी असे बनावट व्हिडिओ बदनामीकारक ठरतील. त्यासाठी आम्ही न्यायालयात गेलो आहोत.

प्रभावी कायदा हवा : के. सुधाकर
माध्यमांचा वापर करून तेजोभंग करण्याचे काम सुरू आहे. हे रोखण्यासाठी न्यायालयात गेलो आहोत. मीडियामध्ये सर्व काही प्रथम येते. त्यामुळे अनेक वर्षापासून कमविलेले नाव, लोकप्रियता क्षणात नाहीशी होते. हे केवळ राजकारणातच नाही तर इतर क्षेत्रातही घडत आहे. सोशल नेटवर्क आणि माध्यमांचा वापर एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी केला जात आहे. ते वास्तविक असल्यास यावर बंदी कोण घालू शकेल. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. जो कोणी चूक करतो त्याला शिक्षा झाली पाहिजे. तथापि, त्यांची बदनामी होऊ नये.

राजकीय षडयंत्र : पाटील
एक शेतकरी मुलगा, कोणी गॉडफादर नसताना इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे. धूर्तपणाच्या राजकीय षडयंत्राचा बळी पडू नये, वस्तुस्थिती जाणून न घेता बदनामी केली जाऊ नये यासाठी आधीच सावधगिरी घेतली आहे. यासाठी आम्ही न्यायालयात विनंती केली आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com