बिहार निवडणुकीत शिवसेना गुप्तेश्वर पांडेंना ताकद दाखवणार - Shivsena to Field Candidate Agianst Bihar EX DGP Gupteshwar Pandey | Politics Marathi News - Sarkarnama

बिहार निवडणुकीत शिवसेना गुप्तेश्वर पांडेंना ताकद दाखवणार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात पांडे महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांच्या विरोधात आक्रमक झाले होते. एखाद्या राजकीय नेत्याला शोभणारी वक्तव्ये त्यांनी पोलिस महासंचालक पदावर असताना केली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्या जेडीयूमध्ये प्रवेश केला.

मुंबई : सुशांतसिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिस व महाराष्ट्राची बदनामी करणारे बिहारचे माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना महाराष्ट्राची ताकद दाखविण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे. पांडेंच्या विरोधात बिहार विधानसभा निवडणुकीत उमेदवार देण्याची तयारी शिवसेनेने केल्याची माहिती शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात पांडे महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांच्या विरोधात आक्रमक झाले होते. एखाद्या राजकीय नेत्याला शोभणारी वक्तव्ये त्यांनी पोलिस महासंचालक पदावर असताना केली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्या जेडीयूमध्ये प्रवेश केला. पांडे हे बिहारच्या बक्सरमधून निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्यासमोर 'दबंग' नेते मुन्ना तिवारींचे आव्हान असेल.  

बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे भाजपाचेच वरिष्ठ नेते, असल्याचा टोला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी लगावला होता. बिहार विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र भारतीय जनता पक्ष रचत असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला होता.

बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपत आहे. एकूण तीन टप्प्यांत ही निवडणूक होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजप आणि लोक जनशक्ती पक्षाच्या आघाडीविरोधात राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस यांची आघाडी असे चित्र दिसत आहे.  

या निवडणुकीत शिवसेना जागा लढविणार असल्याबाबत बोलताना अनिल देसाई म्हणाले, "सुशांत सिंह राजपूत प्रकरणात विनाकारण महाराष्ट्र, मुंबई आणि शिवसेनेला बदनाम करण्यात आले. यामध्ये कोणाचा काहीही संबंध नव्हता हे लोकांना समजत होते. तरीही सूडबुद्धीचं राजकारण केले गेले. आम्ही आता बिहार निवडणूक लढवून याची परतफेड करु. बिहार निवडणुकीत आम्ही ५० जागा लढवणार आहोत. २०१५ ला देखिल शिवसेना बिहारमध्ये निवडणूक लढली होती, त्यावेळी शिवसेनेला दोन लाखांपेक्षा जास्त मते मिळाली होती,"

"डीजीपी पदावरचा माणूस कसा बोलत होता, त्याचा अभिनय कसा होता हे सर्वांनी पाहिले. या पदावर राहून असं वक्तव्य करणं हे पांडेंना न शोभणारे होतं. पण आमचा मावळा त्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. पांडेंना महाराष्ट्राची ताकद कळेल, आम्ही त्यांच्या विरोधात उमेदवार देणार आहोत," असेही देसाई यांनी सांगितले. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख