अकाली दलाने सोडली भाजपची साथ - Shiromani Akali Dal Quits NDA | Politics Marathi News - Sarkarnama

अकाली दलाने सोडली भाजपची साथ

वृत्तसंस्था
रविवार, 27 सप्टेंबर 2020

१९९६ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष व अकाली दल यांच्यात युती झाली. मात्र, संसदेत नुकत्याच संमत झालेल्या तीन कृषी सुधारणा विधेयकांनंतर उभय पक्षांमध्ये मतभेद झाले व त्याचा परिणाम युती तुटण्यात झाला

नवी दिल्ली : कृषी सुधारणा विधेयकावरुन हरसिम्रत कौर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता शिरोमणी अकाली दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) बाहेर पडण्याचा निर्णय काल रात्री जाहीर केला आहे. या निर्णयामुळे भाजपशी त्यांची असलेली चोवीस वर्षांची युती संपुष्टात आली आहे. 

१९९६ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष व अकाली दल यांच्यात युती झाली. मात्र, संसदेत नुकत्याच संमत झालेल्या तीन कृषी सुधारणा विधेयकांनंतर उभय पक्षांमध्ये मतभेद झाले व त्याचा परिणाम युती तुटण्यात झाला. या विधेयकांवरुन विरोधकांनी देशभर रान पेटवले आहे. पंजाबमध्ये आणि हरियाणामध्येही शेतकरी वर्गाने या विधयकांना रस्त्यांवर उतरुन विरोध केला. शेतकरी हे शिरोमणी अकाली दलाचे पाठीराखे मतदार आहेत. त्यांच्याकडून दबाव वाढल्याने अखेर अकाली दलाला एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागला.

पंजाबमध्ये ज्यावेळी कृषी विधेयकांवरुन निदर्शने होत होती त्यावेळी काँग्रेस व आम आदमी पक्षाने अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल यांच्या विरोधात चित्र निर्माण केले होते. बादल हे भाजपची साथ सोडायला तयार नाहीत, असे चित्र रंगविण्यात आले. त्याचा पक्षावर पुढील काळात विपरित परिणाम झाला असता. त्या दबावापोटी अकाली दलाने भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. 

काल अकाली दलाच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक झाली. त्यात एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. ही बैठक सुमारे तीन तास सुरु होती. अकाली दल हा भाजपचा सर्वात जुना सहकारी आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या भावनांबाबत मोदी सरकार कुणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही, त्यामुळे आम्ही एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे बादल यांनी सांगितले.
Edited By - Amit Golwalkar 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख