एका नटीचे बांधकाम पाडल्यावर किंचाळणारे आता शांत का? : संजय राऊत यांचा सवाल - Sanjay Raut Targets BJP Over Hatharas Gang Rape Case | Politics Marathi News - Sarkarnama

एका नटीचे बांधकाम पाडल्यावर किंचाळणारे आता शांत का? : संजय राऊत यांचा सवाल

सरकारनामा ब्युरो
रविवार, 4 ऑक्टोबर 2020

''महिनाभरापूर्वी पंतप्रधान मोदी अयोध्येत आले. रामजन्मभूमीची त्यांनी पूजा केली. त्यावेळी तेथे श्रीरामाबरोबर सीतामाईचाही वावर होता. पण त्याच भूमीवर एक नवी निर्भया स्वतःच्या शरीराची लक्तरे उघडय़ावर टाकून तडफडून मेली. हे सर्व त्याच उत्तर प्रदेशात घडले. तेथे भारतीय जनता पक्षाचे राज्य आहे हे सोडा. पण अशा प्रकारची घटना महाराष्ट्रासारख्या राज्यात घडली असती तर एवढय़ात सरकार बरखास्तीची, राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी झालीच असती,'' असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे

पुणे : 'बेटी बचाव' च्या नारेबाजीत एका बेटीवर बलात्कार व तिची हत्या झाली. हिंदू मुलींना पळवून बलात्कार व हत्या करण्याचे प्रकार पाकिस्तानात घडतात. ते सर्व आता उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये घडले. राहुल गांधींना धक्काबुक्की झाली. हे कसले स्वातंत्र्य! एका नटीसाठी एक कायदा, बेटीचा देह मात्र विटंबना करून जाळला जातो. मनीषा वाल्मीकी कोण? तिचे काय झाले? हे आता निदान अर्ध्या जगाला कळले आहे. मुंबईत एका नटीचे बेकायदेशीर बांधलेले ऑफिस तोडले म्हणून ज्यांना न्याय, अन्याय, महिलांवरील अत्याचाराच्या उचक्या लागल्या ते सर्व लोक मनीषाच्या बेकायदेशीर पेटवलेल्या चितेबाबत थंड आहेत,'' असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधील रोखठोक सदरात केला आहे. 

अभिनेत्री कंगना राणावतचे बेकायदा बांधकाम पाडल्याबद्दल शिवसेना व संजय राऊत यांना टार्गेट करण्यात आले होते. त्याचा राग राऊत यांनी या सदरातून व्यक्त केला आहे. आपल्या सदरातून त्यांनी माध्यमांवरही निशाणा साधला आहे. ''19 वर्षांची मनीषा. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे चार गुंडांनी १९ वर्षांच्या मनिषावर बलात्कार केला. नंतर तिच्यावर निर्घृण हल्ला केला. त्यात ती मरण पावली. 'बेटी बचाव' वाल्यांच्या ढोंगी रामराज्यात एक बेटी 'बचाव बचाव' असा आक्रोश करीत तडफडून मेली. मनीषाला न्याय मिळावा म्हणून सुशांतप्रमाणे कोणी प्रखर आंदोलन चालवले नाही. नटी कंगनाच्या घरावर हातोडा पडताच 'काय हा अन्याय?' असे बोंबलणारा 'मीडिया' देखील कंठशोष करताना दिसला नाही. का?'' असे सांगत 'मनीषा ड्रग्ज घेत नव्हती' 'मनीषा  स्टार किंवा सेलिब्रेटी नव्हती' 'मनीषा ; झोपडीत राहत होती व तिने कोटय़वधी रुपये खर्च करून कोणतेही बेकायदेशीर बांधकाम केले नव्हते,'  राऊत यांनी माध्यमांना चिमटा काढला आहे.

संपूर्ण मीडियाने 'बॉलीवूड' मध्ये कोण कोण ड्रग्ज घेत आहे याचा पंचनामा रोज केला, पण हाथरस कन्येचा आक्रोश त्यांच्या कानाचा पडदा फाडू शकला नाही, असेही राऊत यांनी म्हटले आहे. 

हे सर्व योगींच्या रामराज्यात म्हणजे उत्तर प्रदेशात घडले. अशा घटना अधूनमधून पाकिस्तानात घडत असतात. हिंदूंच्या मुलींना जबरदस्तीने पळवून, बलात्कार करून त्यांना मारून फेकले जाते. हाथरसला वेगळे काय घडले? पण हाथरसला कुणी 'पाकिस्तान' म्हटल्याचे अजून तरी दिसले नाही! असे म्हणत राऊत यांनी कंगना राणावतच्या वक्तव्याची पुन्हा आठवण करुन दिली आहे.

भाजपवरही केली टीका

''महिनाभरापूर्वी पंतप्रधान मोदी अयोध्येत आले. रामजन्मभूमीची त्यांनी पूजा केली. त्यावेळी तेथे श्रीरामाबरोबर सीतामाईचाही वावर होता. पण त्याच भूमीवर एक नवी निर्भया स्वतःच्या शरीराची लक्तरे उघडय़ावर टाकून तडफडून मेली. हे सर्व त्याच उत्तर प्रदेशात घडले. तेथे भारतीय जनता पक्षाचे राज्य आहे हे सोडा. पण अशा प्रकारची घटना महाराष्ट्रासारख्या राज्यात घडली असती तर एवढय़ात सरकार बरखास्तीची, राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी झालीच असती,'' असे म्हणत राऊत यांनी भाजपवरही टीका केली आहे. 

कुठे आहे महिला आयोग?

"राष्ट्रीय महिला आयोग हे नक्की काय प्रकरण आहे ते समजत नाही. कंगना राणावत हिने महाराष्ट्रविरोधी वक्तव्य केले तर शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तिचे थोबाड फोडतील, असे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले. यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी कंगनाच्या सन्मानाचा, सुरक्षेचा मुद्दा समोर आणला. श्री. सरनाईक यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली. तोच महिला आयोग ‘हाथरस’ प्रकरणात चूप बसला,'' असे लिहित महिला आयोगावरही राऊत यांनी निशाणा साधला आहे.

काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचाही समाचार राऊत यांनी घेतला आहे, "हाथरसला जे घडले त्यामुळे देशाची परंपरा, संस्कृतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँगेसचे नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी या पीडित मुलीच्या कुटुंबास भेटायला निघाले तेव्हा त्यांना पोलिसांनी फक्त अडवले असे नाही, तर त्यांची कॉलर पकडून खाली पाडले, असभ्यपणे धक्काबुक्की केली. ज्या इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले व देशाच्या अखंडतेसाठी बलिदान दिले, त्यांचे श्री. राहुल गांधी हे नातू आहेत एवढे भान तरी कॉलर पकडणाऱयांनी ठेवायलाच हवे होते,'' असे राऊत यांनी म्हटले आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख