अखेर सचिन पायलट यांचा सर्वांना 'राम राम सा!'

राजस्थानमध्ये बंडखोरी करणाऱ्या सचिन पायलट यांची काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पुन्हा एकदा राज्यावरील पकड घट्ट केली आहे.
sachin pilot changes his twitter bio and thanks everyone for support
sachin pilot changes his twitter bio and thanks everyone for support

भोपाळ : राजस्थानातील काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांची पक्षाने उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे. पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात थेट बंडाचे निशाण उभारले होते. पायलट यांनी त्यांना पाठिंबा देणाऱ्याचे आभार मानले असून, सर्वांना अभिवादन केले आहे. पक्षाच्या जयपूरमधील राज्य मुख्यालयावरील पायलट यांच्या नावाची पाटीही काढून टाकण्यात आली आहे.

पायलट यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर पायलट यांनी 'सत्याला त्रास दिला जाऊ शकतो परंतु पराभूत करता येत नाही,' असे ट्विट केले होते. यानंतर त्यांनी पुन्हा आणखी एक ट्विट केले आहे. यात म्हटले आहे की, माझ्यामागे आज उभे राहिलेल्या सर्वांचे मनापासून आभार. राम राम सा!

याचबरोबर पायलट यांनी त्यांच्या टि्वटर अकाउंटच्या बायोमधून राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष ही दोन्ही पदे काढून टाकली आहेत. त्यांच्या आधीच्या बायोमध्ये उपमुख्यमंत्री राजस्थान आणि अध्यक्ष, राजस्थान काँग्रेस, असा उल्लेख होता. त्यांनी आता आमदार टोंक, माजी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार व कंपनी व्यवहार मंत्री असे म्हटले आहे. 

राहुल गांधी यांची यंग ब्रिगेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांपैकी एक-एक मोहरा गळू लागला आहे. याची सुरूवात मध्य प्रदेशातून झाली. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी सुमारे तीन महिन्यांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार कोसळले होते. त्यानंतर पुन्हा भाजपचे सरकार येऊन शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री झाले होते. याचबरोबर शिंदे यांनी राज्यसभा सदस्यत्व मिळाले होते. 

आता यंग ब्रिगेडमधील सचिन पायलट यांनी बंड केले. त्यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केला होता. मात्र, अशोक गेहलोत यांनी पायलट यांचे बंड हाणून पाडले. अखेर पायलट यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी होण्यासोबत उपमुख्यमंत्रिपदही काढून घेण्यात आले. पायलट बंड अखेर फसले असून, गेहलोत यांनी राज्यावरील पकड पुन्हा घट्ट केली आहे. याचबरोबर पायलट समर्थक दोन मंत्र्यांनाही मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. 

याच यंग ब्रिगेडमधील जितिन प्रसाद आहेत. उत्तर प्रदेशमधील नेते आणि माजी केंद्रीय मंत्री असलेल्या प्रसाद यांनी उघडपणे पायलट यांचे समर्थन केल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. यामुळे प्रसाद हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्ये पक्षासाठी ब्राह्मण समाजाच्या संघटनाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मागील काही काळापासून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या सक्रिय झाल्या आहेत. तेव्हापासून प्रसाद यांना डावलले जात असल्याचे चित्र आहे. प्रसाद यांनी प्रियांका यांना थेट विरोध केलेला नसला तरी ते नाराज असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

जितिन प्रसाद यांनी पायलट यांचे समर्थन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, सचिन पायलट हे केवळ माझ्यासोबत काम करणारे व्यक्ती नव्हते तर माझे चांगले मित्रही होते. त्यांनी समर्पण भावनेतून पक्षासाठी केलेल्या कामाचे श्रेय कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. लवकरच या परिस्थितीत सुधारणा होईल. अशी परिस्थिती ओढवल्याबद्दल मला दु:ख वाटते. 

जितिन प्रसाद यांच्यानंतर आता मुंबईतील काँग्रेस नेत्या व माजी खासदार प्रिया दत्त यांनी पायलट यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आणखी एक मित्र पक्ष सोडून गेला. सचिन आणि ज्योतिरादित्य हे दोघेही माझे चांगले सहकारी आणि मित्र आहेत. दुर्दैवाने दोन मोठे नेते आणि भविष्यात आणखी मोठी वाटचाल करण्याची क्षमता असलेले दोघेही पक्ष सोडून गेले आहेत. महत्वकांक्षा असणे हे चुकीचे आहे, असे मला वाटत नाही. त्यांनी कठीण काळात पक्षासाठी कठोर परिश्रम घेतले होते.

Edited by Sanjay jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com