अयोध्येत उद्या पंतप्रधान मोदींसोबत मोहन भागवतही असणार मंचावर - rss chief mohan bhagwat will be on stage with narendra modi for ram madir bhoomi pujan | Politics Marathi News - Sarkarnama

अयोध्येत उद्या पंतप्रधान मोदींसोबत मोहन भागवतही असणार मंचावर

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

राम मंदिराचे उद्या अयोध्येत भूमिपूजन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाची जोरदार लगबग अयोध्येत सुरू झाली आहे. या कार्यक्रमावरुन राजकीय वादंगही सुरू आहे. 

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत  उद्या (ता.५) होत आहे. या कार्यक्रमाची अयोध्येत जोरदार लगबग सुरू झाली आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत अयोध्येत दाखल झाले आहेत. याचवेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांना कार्यक्रमाचे निमंत्रण नसून ते कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. 

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या भूमिपूजनाचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्सिंगचे बंधन सर्वांनाच पाळावे लागेल. यामुळे कार्यक्रमाला दोनशेपर्यंत व्यक्ती सहभागी होतील. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आदी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्या मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकाम सुरू होईल.  

मागील वर्षी 9 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील जागा राम मंदिराच्या उभारणीसाठी द्यावी, असा आदेश केंद्र सरकारला दिला होता. त्यानंतर या वर्षी 5 फेब्रुवारीला अयोध्येत मंदिराचे बांधकाम करण्यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्यात आल्याची घोषणा 5 फेब्रुवारीला करण्यात आली होती. अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामावर हे ट्रस्ट देखरेख ठेवणार आहे. 

राम मंदिराच्या भूमिपूजनाचा भव्यदिव्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी राम मंदिरासाठी रथयात्रा काढून देशभरात जनमत उभे करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांना निमंत्रण नाही. याचबरोबर राम मंदिराच्या चळवळीत अडवानींसोबत अग्रस्थानी असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी, कल्याणसिंह, उमा भारती आणि विनय कटियार हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. अडवानी आणि जोशी यांचे नावच निमंत्रितांमध्ये नाही. याचवेळी कल्याणसिंह, उमा भारती आणि विनय कटियार यांची नावे निमंत्रितांमध्ये आहेत. आता यावरुन मोठा गदारोळ सुरू आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या होणाऱ्या कार्यक्रमात मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत असणार आहेत. भागवत हे आज सायंकाळी अयोध्येत दाखल झाले आहेत. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. अडवानी यांना डावलून भागवत यांना स्थान दिल्याने भाजपमध्येही नाराजीचा सूर आहे. मोदी आणि भागवत यांच्यासह मंचावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास उपस्थित असतील. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख