आई-वडिलांच्या चुकांबद्दल मी माफी मागतो; तेजस्वी यादव यांचा जाहीर माफीनामा

बिहारमध्ये काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीवरुन वातावरण तापू लागले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी आता राज्यातील जनतेची माफी मागितली आहे.
rjd leader tejashwi yadav apologizes for his father and mother mistakes
rjd leader tejashwi yadav apologizes for his father and mother mistakes

पाटणा : माझ्या आई-वडिलांची 15 वर्षे राज्यात सत्ता होती. त्यांच्या हातून काही चुका झाल्या असतील तर, या चुकांबद्दल मी तुमची माफी मागतो, अशी जाहीर माफी राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते तेजस्वी यादव यांनी आज मागितली. तेजस्वी यांच्या या भावनिक माफीनाम्यामुळे ते बिहारमधील जनतेच्या हृदयाला हात घालण्यात यशस्वी झाल्याचे मानले जात आहे. मात्र, यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर जनतेची दिशाभूल करीत असल्याची टीका केली आहे. 

आरजेडीचे नेतृत्व तेजस्वी करीत आहेत. पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून त्यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. राज्यातील मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने  (एनडीए) '15 वर्षे विरुद्ध 15 वर्षे' प्रचार सुरू केला आहे. एनडीएची राज्यात 2005 पासून सत्ता आहे. यातील चार वर्षे नितीशकुमार यांच्यासोबत आरजेडी सत्तेत होती. नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाकडून एनडीएची 15 वर्षे आणि लालू प्रसाद यादव यांच्या कार्यकाळातील 15 वर्षे यांची तुलना केली जात आहे. नितीशकुमार यांच्या काळात राज्यात विकास झाल्याचा दावा केला जात आहे. 

या पार्श्वभूमीवर पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलताना तेजस्वी यादव म्हणाले की, 'पक्ष सत्तेत होता, त्यावेळी मी लहान होतो. काही चुका झाल्या असतील तर मी तुमची माफी मागतो.'  लालू प्रसाद यादव आणि राबडीदेवी यांचे पुत्र असलेले तेजस्वी हे केवळ 30 वर्षांचे आहेत. आपल्या आई-वडिलांच्या सत्ताकाळात घडलेल्या चुकांबद्दल माफी मागून त्यांनी जनतेला भावनिक आवाहन केले आहे. हे आवाहन करताना त्यांनी स्वत:च्या कार्यकाळात कोणतीही चूक झालेली नाही, असा दावाही केला आहे. नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात दोन वर्षांपेक्षा कमी काळ ते उपमुख्यमंत्री होते. त्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप झाले होते. यावरुन आरजेडी आणि नितीशकुमार यांचा जेडीयू यांचा काडीमोड झाला होता. त्यानंतर नितीशकुमार यांनी राज्यात पुन्हा भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. 

तेजस्वी यादव यांनी आज राज्यातील बेरोजगारी आणि स्थलांतराच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री नितीशकुमार यांना लक्ष्य केले. राज्यात रोजगाराच्या संधीच नसल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक रोजीरोटीसाठी दुसऱ्या राज्यात जात आहेत. सरकारचा सुशासनाचा दावा फोल ठरला आहे. देशभरातील स्थलांतरित मजूर त्यांच्या मूळ गावी परतत आहेत. यात सर्वाधिक मजूर बिहारमध्ये परतले आहेत, असा टोलाही तेजस्वी यादव यांनी लगावला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com