धक्कादायक : रियाच नव्हे तर, तिच्या कुटुंबीयांनीही सुशांतला लुटले...

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये मोठे वादळ उठले आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू असून, या प्रकरणाला आज वेगळीच कलाटणी मिळाली आहे.
rhea chakraborty and her family members exploited sushant singh rajput claims fir
rhea chakraborty and her family members exploited sushant singh rajput claims fir

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या धक्क्यातून बॉलीवूड अद्याप सावरलेले नाही. त्याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये वादळ उठले आहे. सुशांतच्या आत्महत्येची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाला आज वेगळीच कलाटणी मिळाली आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध सुशांतचे पिता के.के. सिंह यांनीच एफआयआर दाखल केला आहे. केवळ रियाच नव्हे तर, तिच्या कुटुंबीयांनीही सुशांतला लुटले, असे त्यांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे. 

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी काल ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट यांना जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावले होते. भट्ट हे त्यांच्या वकिलांसमवेत काल सांताक्रूज पोलीस ठाण्यात आले. आज धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांची पोलिसांनी चौकशी केली. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला आहे. सुशांतने धर्मा प्रॉडक्शनसोबत शेवटी केलेल्या ड्राईव्ह या चित्रपटाच्या कराराची प्रतही मेहता यांनी पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी यशराज फिल्म्सचे (वायआरएफ) आदित्य चोप्रा आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचीही पोलिसांनी नुकतीच चौकशी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३९ जणांचे जबाब नोंदविले आहेत. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा मॅरेथॉन तपास सुरू आहे. आगामी काळात आणखी काही जणांचे जबाब नोंदविण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

आता सुशांतचे पिता के.के. सिंह यांनी एफआयआर दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. के.के.सिंह यांनी बिहारमधील पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. त्यांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे की, सुशांतला २०१९ मध्ये कोणाताही मानसिक विकार नव्हता. रियाच्या संपर्कात तो आल्यानंतर त्याला मानसिक विकार जडले. त्याच्यावरील मानसिक उपचारासाठी कुटुंबीयांपैकी कोणाचीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. या सर्व प्रकरणात त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टरही सहभागी असावेत. त्यांनी माझ्या मुलाला कोणती औषधे दिली याची चौकशी व्हावी. 

माझ्या मुलाच्या खात्यात १७ कोटी होते. यातील १५ कोटी रुपये त्याच्याशी निगडित नसलेल्या व्यक्तींच्या खात्यात वर्ग झाल्याचे बँक स्टेटमेंटमधून समोर आले आहे. रियाने तिच्या कुटुंबीयांना यातील किती पैसे दिले याची चौकशी व्हावी. सुशांतला आधी चांगले चित्रपट मिळत होते. रिया त्याच्या जीवनात आल्यानंतर त्याला चित्रपट मिळणे बंद झाले. याचीही चौकशी करण्याची गरज आहे. रियाने त्याच्यावरील मानसिक उपचार जगजाहीर करण्याची धमकी दिली होती. रिया आणि तिचे नातेवाईक माझेही सुशांतशी बोलणेही होऊ देत नव्हते. रिया आणि तिच्या नातेवाईकांनी षडयंत्र करुन माझ्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केले, असे के.के.सिंह यांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे. 

सुशांत याने आत्महत्येचे पाऊल नेमके कशामुळे उचलले याचा तपास पोलिस करीत आहेत. त्याच्या आत्महत्येमागे नैराश्याचे अथवा व्यावसायिक शत्रुत्वाचे कारण होते का, याचाही शोध मुंबई पोलीस घेत आहेत. यामुळे याआधी यशराज फिल्म्सच्या कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. शानू यांनी अभिनेता रणवीरसिंह, अर्जुन कपूर, वाणी कपूर यांना चित्रपटसृष्टीत पदार्पणाची संधी दिली होती. सुशांत याच्यासोबत त्यांनी यश राज फिल्म्सच्या शुद्ध देसी रोमान्स आणि डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी या चित्रपटांसाठी काम केले होते. 

सुशांतवर उपचार करणारे मानसोपचारतज्ञ डॉ.केर्सी चावडा यांचाही जबाब पोलिसांनी नोंदविला होता. सुशांतवरील वैद्यकीय उपचाराबाबत माहिती घेण्यासाठी ही चौकशी करण्यात आली होती. त्याची मानसिक स्थिती आणि औषधोपचार याचीही माहिती घेण्यात आली होती. दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) करावा, अशी मागणी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती. मात्र, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची शक्यता फेटाळून लावली होती.

सुशांत याने 14 जूनला मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ३९ जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com