पक्षाचा स्थापनादिन साजरा झाला पण, लालूंशिवाय..!

बिहारमधील विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यामुळे राष्ट्रीय जनता दलाने आज स्थापनादिन जोरात साजरा केला. मात्र, या वेळी पक्षाचे संस्थापक लालूप्रसाद यादव यांची अनुपस्थिती सर्वांनाच जाणवली.
rashtriya janata dal celebrates foundation day without lalu prasad yadav
rashtriya janata dal celebrates foundation day without lalu prasad yadav

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचा 24 वा स्थापना दिन रविवारी साजरा करण्यात आला. या वेळी लालूंचे पुत्र तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव उपस्थित होते. स्थापना दिनाच्या कार्यक्रमात तेजस्वी यादव यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राज्यातील आणि केंद्रातील  सरकारविरोधात मोहीम सुरू केली. मात्र, या वेळी पक्षाचे संस्थापक लालूप्रसाद यादव यांची अनुपस्थिती सर्वांनाच जाणवणारी होती. लालूंच्या शिवाय स्थापना दिन साजरा होणारे हे सलग तिसरे वर्ष आहे. 

लालूप्रसाद यादव यांनी 1997 मध्ये पक्षाची स्थापना केली होती. जनता दलात फूट पडल्याने लालू यांनी राष्ट्रीय जनता दल नावाने वेगळी चूल मांडली. त्यानंतर त्यांनी राज्यातील सत्ता हस्तगत केली. त्यांच्यावर विविध गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी पत्नी राबडीदेवी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे दिली. लालूंच्या शिवाय स्थापना दिन साजरा होणारे हे सलग तिसरे वर्ष आहे. ते सध्या चारा गैरव्यवहारप्रकरणी रांची कारागृहात आहेत. 

स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात तेजस्वी यादव यांनी इंधन दरवाढीवरून सरकारला लक्ष्य करण्यासाठीची मोहीम सुरू केली. त्यांनी सायकल रॅलीचे आयोजन केले होते. ते स्वत: पाच किलोमीटर सायकल चालवत घरी पोचले. त्यांच्यासोबत बंधू तेजप्रताप यादव हेही उपस्थित होते. 

आरजेडीचे नेतृत्व तेजस्वी करीत आहेत. पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून त्यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. राज्यातील मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने  (एनडीए) '15 वर्षे विरुद्ध 15 वर्षे' प्रचार सुरू केला आहे. एनडीएची राज्यात 2005 पासून सत्ता आहे. यातील चार वर्षे नितीशकुमार यांच्यासोबत आरजेडी सत्तेत होती. नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाकडून एनडीएची 15 वर्षे आणि लालू प्रसाद यादव यांच्या कार्यकाळातील 15 वर्षे यांची तुलना केली जात आहे. नितीशकुमार यांच्या काळात राज्यात विकास झाल्याचा दावा केला जात आहे. 

या पार्श्वभूमीवर नुकतेच तेजस्वी यादव म्हणाले होते की, 'पक्ष सत्तेत होता, त्यावेळी मी लहान होतो. काही चुका झाल्या असतील तर मी तुमची माफी मागतो.'  लालू प्रसाद यादव आणि राबडीदेवी यांचे पुत्र असलेले तेजस्वी हे केवळ 30 वर्षांचे आहेत. आपल्या आई-वडिलांच्या सत्ताकाळात घडलेल्या चुकांबद्दल माफी मागून त्यांनी जनतेला भावनिक आवाहन केले आहे. हे आवाहन करताना त्यांनी स्वत:च्या कार्यकाळात कोणतीही चूक झालेली नाही, असा दावाही केला आहे. नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात दोन वर्षांपेक्षा कमी काळ ते उपमुख्यमंत्री होते. त्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप झाले होते. यावरुन आरजेडी आणि नितीशकुमार यांचा जेडीयू यांचा काडीमोड झाला होता. त्यानंतर नितीशकुमार यांनी राज्यात पुन्हा भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. 

तेजस्वी यादव यांनी आज राज्यातील बेरोजगारी आणि स्थलांतराच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री नितीशकुमार यांना लक्ष्य केले. राज्यात रोजगाराच्या संधीच नसल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक रोजीरोटीसाठी दुसऱ्या राज्यात जात आहेत. सरकारचा सुशासनाचा दावा फोल ठरला आहे. देशभरातील स्थलांतरित मजूर त्यांच्या मूळ गावी परतत आहेत. यात सर्वाधिक मजूर बिहारमध्ये परतले आहेत, असा टोलाही तेजस्वी यादव यांनी लगावला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com