नवी दिल्ली : शेतकरी कायद्यांवरुन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्चनंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सरकार पुन्हा शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची शक्यता धूसर बनली असल्याचे सांगण्यात येत आहे. आता मोदी सरकार कृषी कायद्यांबाबत अधिक कडक भूमीका घेईल, असेही बोलले जात आहे. दरम्यान, भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून शेतकऱ्यांनी हातात लाठ्या घेऊन यावे असे आवाहन ते करत असल्याचे त्यात दिसत आहे.
दोन महिन्यांच्या शांततापूर्ण आंदोलनानंतर काल दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या रॅलीदरम्यान झालेल्या प्रकरणात पोलिसांनी बावीस गुन्हे दाखल केले आहेत. काल झालेल्या आंदोलना दरम्यान एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये अनेक शेतकरी नेत्यांची नावे असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्यांचा तपास दिल्ली पोलिसांची क्राईम ब्रँच आणि स्पेशल सेलकडून करण्यात येणार आहे.
दिल्लीत काही भागात शेतकरी आंदोलनाला काल हिंसक वळण लागले. पोलिसांनी लावलेली बॅरिकेड्स तोडून शेतकरी दिल्लीत घुसल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना पांगवावे लागले. पण शेतकरी आक्रमक झाल्याने पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचाही प्रयत्न करण्यात आला. याच दरम्यान एका पलटी झालेल्या ट्रॅक्टरखाली शेतकरी अडकला. पण त्याचा जागेवर मृत्यू झाला होता.
काल शेतकऱ्यांना भडकविण्यात पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याचा हात असल्याचा आरोप होत आहे. स्वतः टिकैत यांनीही हा आरोप केला आहे. मात्र, ते स्वतःच शेतकऱ्यांना हातात लाठ्या घेऊन येण्याचे आवाहन करीत असल्याचे व्हिडिओवरुन दिसत असल्याने हा सर्व पूर्वनियोजित कट असावा, असा आरोप करायला दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांना वाव मिळाला आहे.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.