खासदार अमरसिंह यांचे दीर्घ आजाराने निधन - rajya sabha mp amar singh dies due to prolonged illnes | Politics Marathi News - Sarkarnama

खासदार अमरसिंह यांचे दीर्घ आजाराने निधन

वृत्तसंस्था
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

देशातील राजकारणात एकेकाळी केंद्रस्थानी असलेले खासदार अमरसिंह यांचे आज निधन झाले. त्यांच्यावर सिंगापूर येथील रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

नवी दिल्ली : देशातील राजकारणात एकेकाळी केंद्रस्थानी असलेले समाजवादी पक्षाचे माजी नेते आणि राज्यसभा खासदार अमरसिंह यांचे आज दीर्घआजाराने निधन झाले. मागील काही महिन्यांपासून त्यांच्यावर सिंगापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. 

अमरसिंह यांना 2013 पासून मूत्रपिंड विकाराने ग्रासले होते. त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना उपचारासाठी सिंगापूरला हलविण्यात आले होते. मागील काही महिन्यांपासून त्यांच्यावर तेथील रुग्णालयात उपचार सुरू होते. ते अतिदक्षता विभागाच दाखल होते. आज त्यांचे निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही आज रुग्णालयात उपस्थित होते.

काही वर्षांपूर्वी देशातील राजकारणात प्रत्येक पक्षात अमरसिंह हे परिचित नाव होते. समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यांचे ते निकटवर्ती होते. त्यांची बरीच कारकिर्द मुलायमसिंह यांच्यासोबतच गेली. अखेर मुलायम यांच्याशी संबंध बिघडल्याने त्यांनी स्वत:चा नवा पक्ष स्थापन केला होता. समाजवादी पक्षात परत जाणार नाही, अशी जाहीर भूमिका त्यांनी घेतली होती. महानायक अमिताभ बच्चन यांच्याशीही अमरसिंह यांचे घनिष्ठ संबंध होते. 

अमरसिंह यांनी आज सकाळीच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करणारे ट्विट केले होते. याचबरोबर त्यांनी ट्विटरवर त्यांच्या फॉलोअर्सना बकरी ईदच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. बऱ्याच काळापासून आजारी असूनही ते सोशल मीडियावर सक्रिय होते. त्यांनी 22 मार्चला ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. कोरोनाविषाणूच्या संकटाशी लढताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वांनी मदत करावी, असा संदेश त्यांनी व्हिडीओत दिला आहे. याचबरोबर अमरसिंह यांचा मृत्यू झाल्याच्या अफवा काही महिन्यांपूर्वी पसरल्या होत्या. त्यांनी त्यावेळी मार्च महिन्यात आणखी एक व्हिडीओ पोस्ट करुन टायगर जिंदा है, असे म्हटले होते.  

अमरसिंह यांच्या निधनाबद्दल अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. संरक्षण मंत्री राजनाथसिंह म्हणाले की, ज्येष्ठ नेते आणि खासदार अमरसिंह यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:ख झाले. सार्वजनिक जीवनात आम्ही दोघे मित्र होतो. त्यांचा स्वभाव विनोदी होता. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख