अखेर राजस्थानमध्ये गेहलोत अन् राज्यपालांचे 'मिले सूर मेरा तुम्हारा' - rajasthan governor kalraj mishra gives nod to assembly session from 14 august | Politics Marathi News - Sarkarnama

अखेर राजस्थानमध्ये गेहलोत अन् राज्यपालांचे 'मिले सूर मेरा तुम्हारा'

वृत्तसंस्था
बुधवार, 29 जुलै 2020

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. यातच राज्यपाल विरुद्ध गेहलोत असा वाद सुरू झाला होता. तो आता मिटला असून, दोघांचे सूर जुळले आहेत. 

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंड पुकारले आहे. यातच विधानसभा अधिवेशन बोलावण्याच्या मुद्द्यावरुन राज्यपाल कलराज मिश्रा आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यात जुंपली होती. गेहलोत यांनी आज राज्यपालांची पुन्हा एकदा राजभवनावर जाऊन भेट घेतली. यामुळे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्याचे पुन्हा सूर जुळले आहेत. राज्यपालांनी अधिवेशनासही होकार दर्शविला आहे. 

मंत्रिमंडळाने अधिवेशन बोलावण्यासाठी पाठविलेला पहिला प्रस्ताव राज्यपालांनी फेटाळला होता. त्यानंतर मंत्रिमंडळाने दुसरा प्रस्ताव पाठविला होता. याला राज्यपालांनी उत्तर देऊन त्याविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर तिसरा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यात आला होता. राज्यपालांनी तिसऱ्या प्रस्तावालासुद्धा नकारघंटा कायम ठेवली होती. त्या प्रस्तावातही राज्यपालांनी त्रुटी काढल्या होत्या. राज्य सरकारने तातडीने अधिवेशन बोलावण्यासाठी कोणतेही कारण दिलेले नाही. कोणतेही कारण दिलेले नसेल तर २१ दिवस पूर्वसूचना देऊन अधिवेशन बोलवता येईल, असे राज्यपालांनी म्हटले होते. 

यानंतर गेहलोत यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे १५ मिनिटे चर्चा झाली. या बैठकीनंतर गेहलोत यांनी पुन्हा एकदा मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. या बैठकीत चर्चा करुन अखेर चौथ्यांदा राज्यपालांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. हा प्रस्ताव राज्यपालांनी मान्य केला आहे. विधानसभा अधिवेशन १४ ऑगस्टपासून बोलावण्यास राज्यपालांनी मान्यता दिली आहे. याचबरोबर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अधिवेशनादरम्यान सर्व उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. 

पायलट हे राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री होते. त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात बंड केल्याने काँग्रेसने त्यांची प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रिपदावरुन उचलबांगडी केली आहे. याचबरोबर विधानसभा अध्यक्षांनी पायलट आणि इतर १८ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. या नोटिशीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने या प्रकरणी स्थगिती दिली आहे. याला विधानसभा अध्यक्ष सी.पी.जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील याचिका अखेर मागे घेतली आहे. 

सचिन पायलट आणि बंडखोरांमुळे राजस्थानातील कॉंग्रेसचे सरकार संकटात सापडले आहे. या सरकारपुढे बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान आहे. मागील काही दिवसांपासून या राज्यातील राजकारण चांगले तापले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. कॉंग्रेसची मोठी फौजच गेहलोत सरकार कोणत्याही परिस्थितीत वाचविण्यासाठी पुढे आली आहे. पायलट यांनी बंड केल्याने गेहलोत आक्रमक झाले आहेत. राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले तेव्हापासून मुख्यमंत्री म्हणून मी आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामध्ये कोणताही संवादच नव्हता, असा खुलासाही खुद्द गेहलोतांनीच केला होता.

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख