पंतप्रधान मोदींनी राजस्थानातील तमाशा आता थांबवावा : गेहलोत

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. यावरुन राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. राज्यातील घडामोडींना भाजप जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसकडून होत आहे.
rajasthan chief minister ashok gehlot targets prime minister narendra modi
rajasthan chief minister ashok gehlot targets prime minister narendra modi

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंड पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी विधानसभा अधिवेशन बोलावण्यास होकार दिला आहे. यामुळे राज्यातील राजकीय हालचाली पुन्हा वेगवान झाल्या आहेत. आता गेहलोत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच राजस्थानातील वादात ओढले आहे. 

विधानसभा अधिवेशन १४ ऑगस्टपासून बोलावण्यास राज्यपालांनी मान्यता दिली आहे. याचबरोबर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अधिवेशनादरम्यान सर्व उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. आता विधानसभा अधिवेशन होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. गेहलोत सरकारसाठी हे अधिवेशन कसोटीचे तर पायलट यांच्यासाठी अस्तित्वाचे ठरणार आहे. यामुळे गेहलोत हे फार खबरदारी घेत आहेत. त्यांनी आधी काँग्रेस आमदारांना जयपूरमधील हॉटेल फेअरमाँटमध्ये ठेवले होते.  आता या आमदारांना जैसलमेरमधील सूर्यगड हॉटेलमध्ये हलविण्यात आले आहे. 

राज्यातील सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे, असा आरोप गेहलोत वारंवार करीत आहेत. या प्रकरणी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही पत्र लिहिले होते. तसेच, पंतप्रधान मोदींशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन राज्यातील परिस्थिती त्यांच्या कानावर घातली होती. आज जैसलमेर येथे बोलताना गेहलोत यांनी थेट मोदींना या प्रकरणी कार्यवाही करण्याचे पुन्हा साकडे घातले. ते म्हणाले की, हा काय तमाशा सुरू आहे? राज्यात घोडेबाजार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आता राज्यात सुरू असलेला तमाशा आता थांबवायला हवा. 

पायलट हे राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री होते. त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात बंड केल्याने काँग्रेसने त्यांची प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रिपदावरुन 14 जुलैला उचलबांगडी केली होती. याचबरोबर विधानसभा अध्यक्षांनी पायलट आणि इतर १८ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. या नोटिशीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने या प्रकरणी स्थगिती दिली आहे. याला विधानसभा अध्यक्ष सी.पी.जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आता याला काँग्रेसचे मुख्य प्रतोद महेश जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com