टीपीडीचे चार खासदार भाजपमध्ये गेलेले कसे चालतात? गेहलोत यांचा सवाल - rajasthan chief minister ashok gehlot targets bjp over tdp mps issue | Politics Marathi News - Sarkarnama

टीपीडीचे चार खासदार भाजपमध्ये गेलेले कसे चालतात? गेहलोत यांचा सवाल

वृत्तसंस्था
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. यावरुन राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. राज्यातील घडामोडींना भाजप जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसकडून होत आहे. 
 

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंड पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी विधानसभा अधिवेशन बोलावण्यास अखेर होकार दिला आहे. यामुळे राज्यातील राजकीय हालचाली पुन्हा वेगवान झाल्या आहेत. बहुजन समाज पक्षाचे राज्यातील सहा आमदार काँग्रेसमध्ये विलिन झाले होते. याला आक्षेप घेण्यात येत असल्याने या मुद्द्यावरुन गेहलोत यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. 

विधानसभा अधिवेशन १४ ऑगस्टपासून बोलावण्यास राज्यपालांनी मान्यता दिली आहे. याचबरोबर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अधिवेशनादरम्यान सर्व उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. आता विधानसभा अधिवेशन होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. गेहलोत सरकारसाठी हे अधिवेशन कसोटीचे तर पायलट यांच्यासाठी अस्तित्वाचे ठरणार आहे. यामुळे गेहलोत हे फार खबरदारी घेत आहेत. त्यांनी आधी काँग्रेस आमदारांना जयपूरमधील हॉटेल फेअरमाँटमध्ये ठेवले होते.  आता या आमदारांना जैसलमेरमधील सूर्यगड हॉटेलमध्ये हलविण्यात आले आहे. 

गेहलोत यांनी सत्तास्थापना केली त्यावेळी बहुजन समाज पक्षाचे सहा आमदार काँग्रेसमध्ये विलिन झाले होते. याबद्दल बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आक्षेप नोंदविला आहे. या प्रकरणी बहुजन समाज पक्ष न्यायालयात गेला आहे. याचा गेहलोत यांनी आज समाचार घेतला. 

गेहलोत म्हणाले की, मायावती यांच्यावर केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्त वसुली संचालनालयाचा दबाव आहे. त्यामुळे त्या काँग्रेसवर आरोप करीत आहेत. बहुजन समाज पक्षाचे आमदार काँग्रेसमध्ये कायद्यानुसार विलिन झाले आहेत. भाजपमध्ये तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) चार राज्यसभा खासदार आले होते. त्यावेळी कोणीच काही प्रश्न उपस्थित केले नव्हते. 

पायलट हे राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री होते. त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात बंड केल्याने काँग्रेसने त्यांची प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रिपदावरुन 14 जुलैला उचलबांगडी केली होती. याचबरोबर विधानसभा अध्यक्षांनी पायलट आणि इतर १८ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. या नोटिशीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने या प्रकरणी स्थगिती दिली आहे. याला विधानसभा अध्यक्ष सी.पी.जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आता याला काँग्रेसचे मुख्य प्रतोद महेश जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख