अधिवेशन आमचा हक्कच! गेहलोत यांच्यासह मंत्रिमंडळाने राज्यपालांना ठणकावले

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात सचिन पायलट यांना फडकावलेला बंडाच्या निशाणानंतर राज्यातील राजकीय तिढा दिवसेंदिवस वाढत आहे. आता राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री असा संघर्ष राज्यात सुरू झाला आहे.
rajasthan cabinet demands assembly session on 31 july says sources
rajasthan cabinet demands assembly session on 31 july says sources

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंड पुकारले आहे. आता विधानसभा अधिवेशन बोलावण्याच्या मुद्द्यावरुन राज्यपाल कलराज मिश्रा आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यात जुंपली आहे. विधानसभा अधिवेशन बोलाविण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली सुमारे दोन तास आज मंत्रिमंडळ बैठक झाली. यात शुक्रवारी (ता.३१) अधिवेशन बोलवावे यावर एकमुखाने निर्णय झाला आहे. 

पायलट हे राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री होते. त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात बंड केल्याने काँग्रेसने त्यांची प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रिपदावरुन उचलबांगडी केली आहे. याचबरोबर विधानसभा अध्यक्षांनी पायलट आणि इतर १८ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. या नोटिशीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने या प्रकरणी स्थगिती दिली आहे. याला विधानसभा अध्यक्ष सी.पी.जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील याचिका अखेर मागे घेतली आहे. 

मंत्रिमंडळाने अधिवेशन बोलावण्यासाठी पाठविलेला पहिला प्रस्ताव राज्यपालांनी फेटाळला होता. त्यानंतर मंत्रिमंडळाने दुसरा प्रस्ताव पाठविला होता. याला राज्यपालांनी उत्तर देऊन त्याविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. आहे. यावर चर्चा करण्यासाठी गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. ही बैठक सुमारे दोन तासांहून अधिक काळ चालली. या बैठकीत विधानसभा अधिवेशन बोलावण्याबाबत नवा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्याचे ठरल्याचे समजते. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा अधिवेशन बोलावणे हा मंत्रिमंडळाचा हक्क असल्याचे गेहलोत यांनी या वेळी सांगितले. विधानसभा अधिवेशन आमचा हक्क असल्याने ते ३१ जुलैलाच बोलवावे, असा प्रस्ताव मंत्रिमंडळाने एकमुखाने संमत केला आहे. अधिवेशन बोलावण्यासाठी २१ दिवसांची पूर्वसूचना देण्याची आवश्यकता नसल्याचेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. मंत्रिमंडळाने आता पुन्हा एकदा राज्यपालांना थेट लक्ष्य केले आहे. 

सचिन पायलट आणि बंडखोरांमुळे राजस्थानातील कॉंग्रेसचे सरकार संकटात सापडले आहे. या सरकारपुढे बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान आहे. मागील काही दिवसांपासून या राज्यातील राजकारण चांगले तापले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. कॉंग्रेसची मोठी फौजच गेहलोत सरकार कोणत्याही परिस्थितीत वाचविण्यासाठी पुढे आली आहे. पायलट यांनी बंड केल्याने गेहलोत आक्रमक झाले आहेत. राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले तेव्हापासून मुख्यमंत्री म्हणून मी आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामध्ये कोणताही संवादच नव्हता, असा खुलासाही खुद्द गेहलोतांनीच केला आहे.

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com