rahul gandhi demands government should give monthly payment to workers | Sarkarnama

राहुल गांधी म्हणाले, कष्टकऱ्यांना दरमहा साडेसात हजार रुपये द्या

वृत्तसंस्था
शनिवार, 23 मे 2020

राहुल गांधींनी गेल्या आठवड्यात स्थलांतरित मजुरांची सुखदेव विहार भागात भेट घेतली होती. या भेटीचा व्हिडिओ त्यांनी आपल्या यू ट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध करून मजुरांच्या अवस्थेवर सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. 

नवी दिल्ली : स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर सातत्याने प्रहार करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अगतिकतेमुळे पलायन करणाऱ्या मजुरांसंदर्भात माहितीपट प्रसिद्ध करून केंद्राने या 13 कोटी कष्टकऱ्यांना त्वरित 7 हजार 500 रुपये दरमहा आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली आहे. 

काँग्रेस आणि 22 विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर आर्थिक संकटाचा ठपका ठेवताना 20 लाख कोटींच्या पॅकेजवर तोफ डागली होती. तसेच अकरा कलमी मागण्याही पुढे केल्या होत्या. त्यात गरिबांना पाच महिन्यांसाठी दरमहा साडेसात हजार रुपये देण्याची विरोधकांची मागणी असून अशाच प्रकारच्या अर्थसाहाय्याची राजीव गांधी किसान न्याय योजना काँग्रेसने छत्तीसगडमध्ये लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी गेल्या आठवड्यात (16 मे) स्थलांतरित मजुरांची सुखदेव विहार भागात भेट घेतली होती. या भेटीचा व्हिडिओ त्यांनी आपल्या यू ट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध करून मजुरांच्या अवस्थेवर सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या सतरा मिनिटांच्या व्हिडिओद्वारे स्थलांतरित मजुरांच्या व्यथा मांडल्या असल्याचाही दावा राहुल गांधींनी केला आहे. 

सोल्युशन नव्हे पोल्युशन : भाजप  

दिल्लीहून आपापल्या गावी चालत जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांबरोबर चर्चा करून, त्यांच्या वेदना समजावून घेऊन, त्याचाही व्हिडिओ सार्वत्रिक करणारे काँग्रेस नेते आणि केरळचे खासदार राहुल गांधी यांच्यावर भाजपने, हे तर ‘सोल्युशन नवे पोल्युशन’ असा घणाघाती हल्ला चढवला आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये स्थलांतरित मजूरांबरोबर चर्चा केली. त्याचा व्हिडिओही प्रसिद्ध केला. या जाहिरातबाजीवरच भाजपने बोट ठेवले आहे. केंद्रीय मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले, की राहुल गांधी यांना प्रश्‍नांवर तोडगा म्हणजे सोल्युशन नको आहे. ते फक्त राजकीय प्रदूषण म्हणजे पॉलिटिकल पोल्युशन पसरवत आहेत. त्यांना या स्थलांतरित मजुरांच्या वेदना समजून घ्यायच्या होत्या की यानिमित्ताने स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात आणायचे होते, हे कळण्यास मार्ग नाही. कोरोनाशी लढण्यासाठी सार्‍या देशातील राजकीय पक्षांनी एकत्रित यावे, यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार केलेले आवाहन काँग्रेसच्या पचनी पडत नाही, असेही नकवी यांनी म्हटले. मोदी सरकार या लढाईत अविरत संघर्षरत आहे. मात्र राहुल गांधी रोजच्यारोज निव्वळ भ्रम पसरवत आहेत, असे नक्वी म्हणाले. 

 

 

हे तर काँग्रेसचेच अपयश: मायावती 

मायावती यांनी काँग्रेसला धारेवर धरताना भाजप सरकारही काँग्रेसच्या पदचिन्हयांवरच चालत असल्याचे म्हटले आहे. स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळानंतरही कोट्यवधी लोकांच्या रोजीरोटीची व्यवस्था झाली नाही, हे काँग्रेसचेच अपयश असल्याचे सांगून मायावतींनी म्हटले की, राहुल गांधी यांचा व्हिडिओ म्हणजे, कष्टकऱ्यांचाबद्दलची सहानुभूती कमी आणि नाटकबाजी जास्त आहे. आज देशातील या कोट्यावधी मजुरांच्या दुर्दशेला काँग्रेस शासनच जबाबदार आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षांनी त्यांच्या रोजीरोटीची व्यवस्था झाली असली असती तर त्यांना एक राज्य सोडून दुसऱ्या राज्यात असे पलायन करावे लागले नसते.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख