काँग्रेस प्रदेशाध्यक्षच म्हणतात, राजस्थानची पुनरावृत्ती पंजाबमध्ये सुरू - punjab congress president claims party mps acting against party | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेस प्रदेशाध्यक्षच म्हणतात, राजस्थानची पुनरावृत्ती पंजाबमध्ये सुरू

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. राजस्थानमधील बंड अद्याप शमलेले नसताना आता पंजाबमध्ये याची पुनरावृत्ती सुरू झाली आहे.  

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंड पुकारले आहे. राजस्थानमधील हे बंड शमलेले नसतानाच आता पंजाब काँग्रेसमध्ये मोठा वाद सुरू झाला आहे. पंजाबमध्ये काँग्रेस सत्तेत असून, स्वत:च्याच सरकारविरोधात पक्षाच्या दोन खासदारांनी कारवाया केल्याचे समोर आले आहे. यावर खुद्द काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनीच राजस्थानची पुनरावृत्ती पंजाबमध्ये सुरु असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. 

पंजाब काँग्रेसमधील वादाच्या केंद्रस्थानी राज्यसभा खासदार प्रतापसिंग बाजवा आणि शमशेरसिंग डुल्लो हे आहेत. पंजाबमध्ये विषारी दारूकांड झाले होते. या दारूकांडात तब्बल शंभरहून अधिक जणांचा बळी गेला आहे. या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्त वसुली संचालनालयामार्फत करावी, अशी मागणी राज्यपाल व्ही.पी. सिंह बडनोर यांच्याकडे केली होती. 

आपल्याच पक्षाच्या विरोधात खासदारांनी भूमिका घेतल्याने पंजाबमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. बाजवा आणि डुल्लो यांच्या विरोधात पंजाब काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी या प्रकरणी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून दोन्ही खासदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. राज्यात 2022 मध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळेच यामागे भाजपची फूस आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. 

राजस्थानमध्ये जानेवारी महिन्यात 107 अर्भकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी सचिन पायलट यांनी स्वत:च्याच पक्षाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. आता राजस्थानातील कॉपी-पेस्ट राजकारण पंजाबमध्ये सुरू आहे. फक्त पायलट यांच्या जागी पंजाबमध्ये दोन खासदार आहेत. मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी 2022 मधील निवडणुका लढविण्याचे जाहीर केल्यापासून हे दोन्ही खासदार भाजपशी संधान बांधून पक्षविरोधी कारवाया करीत आहेत, असे जाखड यांनी म्हटले आहे. 

काँग्रेसने त्याचवेळी पायलट यांच्यावर कारवाई केली असती तर ही वेळच आली नसती, असा दावाही जाखड यांनी केला. ते म्हणाले की, राजस्थानमध्ये घडलेल्या घडामोडींप्रमाणे पंजाबमध्ये गोष्टी घडू लागल्या आहेत. बाजवा आणि डुल्लो हे पक्षासाठी धोकादायक असल्याचे मी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. प्रत्येक पक्षात मतभेद असतात. मात्र, ते कोठे व्यक्त करावयाचे याच्या जागा ठरलेल्या असतात. या दोन्ही खासदारांनी अतिशय मोठी बेशिस्त दाखवून दिली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी.  

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख