मोठी बातमी : राजस्थाननंतर आता पंजाब काँग्रेसमध्ये बंडाळी - punjab congress chief demands action against two party mps | Politics Marathi News - Sarkarnama

मोठी बातमी : राजस्थाननंतर आता पंजाब काँग्रेसमध्ये बंडाळी

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. राजस्थानमधील बंड अद्याप शमलेले नसताना आता पंजाबमध्ये काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. 

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंड पुकारले आहे. राजस्थानमधील हे बंड शमलेले नसतानाच आता पंजाब काँग्रेसमध्ये मोठा वाद सुरू झाला आहे. पंजाबमध्ये काँग्रेस सत्तेत असून, स्वत:च्याच सरकारविरोधात पक्षाच्या दोन खासदारांनी कारवाया केल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण आता पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यापर्यंत पोचले आहे. 

पंजाब काँग्रेसमधील वादाच्या केंद्रस्थानी राज्यसभा खासदार प्रतापसिंग बाजवा आणि शमशेरसिंग डुल्लो हे आहेत. पंजाबमध्ये विषारी दारूकांड झाले होते. या दारूकांडात तब्बल शंभरहून अधिक जणांचा बळी गेला आहे. या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्त वसुली संचालनालयामार्फत करावी, अशी मागणी राज्यपाल व्ही.पी. सिंह बडनोर यांच्याकडे या दोघांनी केली होती. 

आपल्याच पक्षाच्या विरोधात खासदारांनी भूमिका घेतल्याने पंजाबमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. बाजवा आणि डुल्लो यांच्या विरोधात पंजाब काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी या प्रकरणी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून दोन्ही खासदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

ज्या थाळीत जेवले त्याच थाळीत या खासदारांनी छेद केला, अशी टीका जाखड यांनी केली आहे. ते म्हणाले की, दोघांना ज्या हाताने जेवण दिले त्यालाच चावताना लाज वाटली नाही. स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी हे दोघे विषारु दारुकांडाचा आधार घेत आहेत. या दोघांमध्येही निवडणूक लढण्याची धमक नाही. पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी दोघांवर कठोर कारवाई करण्यात येईल. पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या अशा सदस्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याची गरज आहे.   

केवळ काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या जिवावर हे दोन्ही खासदार झाले आहेत. महत्वाच्या मुद्द्यांवर ते पक्षाच्या बाजूने राज्यसभेत उभे राहतील याची कोणतीही शाश्वती नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पंजाबच्या हिताच्या एकाही मुद्द्यावर या दोघांनी आतापर्यंत एकदाही आवाज उठवला नाही. त्यांनी पक्षाचा विश्वासघात केला असून, राजकीय लोभापोटी ते पक्षाच्या विरोधात कारवाया करीत आहेत, असे जाखड यांनी नमूद केले.

पंजाबध्ये आता राजस्थानची पुनरावृत्ती होत असल्याचे चित्र आहे. पायलट हे राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री होते. त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात बंड केल्याने काँग्रेसने त्यांची प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रिपदावरुन 14 जुलैला उचलबांगडी केली होती. याचबरोबर विधानसभा अध्यक्षांनी पायलट आणि इतर १८ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख