देशात कोरोनाचा वाढला कहर; मोदी करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा

देशात कोरोनाच्या संकटाच्या तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, देशातील रुग्णसंख्या 3 लाखांवर पोचली आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.
prime minister narendra modi will interact with all states chief minister
prime minister narendra modi will interact with all states chief minister

नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या वाढच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी १६ व १७ जूनला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहेत. मोदी हे  १७ जूनला (बुधवारी) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह काही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या राज्यांसाठी वेगळी नियमावली व उपाययोजना करण्याबाबत निर्णय होणार आहे. 

देशभरात मागील २४ तासांत कोरोनाचे ११ हजार ४१५ नवे रूग्ण सापडले आहेत आणि ३८६ जणांचा बळी गेला आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या ३ लाख ८ हजार ९९३ तर मृतांची संख्या ८ हजार ८८४ झाली आहे. अमेरिका, ब्राझील व रशियानंतर भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. दिल्ली आणि मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी निम्म्यापेक्षा अधिक रुग्ण महाराष्ट्र, दिल्ली व तमिळनाडू या तीन राज्यांत आहेत. 

या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांची चर्चेची ही सहावी फेरी होणार आहे. दिल्ली आणि मुंबईसह इतर महानगरांतील सार्वजनिक वाहतूक, कोरोना संकटामुळे अडचणीत आलेल्या राज्यांकडून वारंवार होणारी आर्थिक मदतीची मागणी, वेगळ्या स्वरुपातील लॉकडाउनच्या शक्‍यता तपासणे यावरही चर्चा होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करण्याची शक्यता आहे. 

पंतप्रधान मोदी हे १६ जूनला २१ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. यात पंजाब, आसाम, केरळ, उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, नागालँड, मेघालय, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, चंडीगड, पुद्दुचेरी, लडाख, दादरा नगर हवेली, अंदमान निकोबार, दमण- दीव व लक्षद्वीप यांचा समावेश आहे. यानंतर मोदी १७ जूनला १४ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. यात महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, पश्‍चिम बंगाल, बिहार, आंध्र प्रदेश, हरियाना, जम्मू-कश्‍मीर, तेलंगणा, ओडिशा यांचा समावेश आहे. 

अनलॉक-१ नंतर देशातील कोरोना प्रादुर्भावाच्या स्थितीची सविस्तर अहवाल केंद्र सरकार राज्यांकडून मागण्याची शक्यता आहे. तसेत, काही राज्यांतील आरोग्य व्यवस्थेत असलेल्या त्रुटींबाबत मोदी काही सूचना करणे अपेक्षित आहे. याचबरोबर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून केंद्र सरकारला काही सूचना केल्या जाऊ शकतात. दिल्ली, महाराष्ट्र, तमिळनाडू व गुजरात या बाधित सर्वाधिक रुग्णसंख्या असल्याने त्यांच्यासाठी वेगळ्या उपाययोजनांची घोषणा होण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये नागरिकांच्या मुक्त संचारावर बंधने घालण्यात आली असून, त्याचप्रकारे देशपातळीवर बंधने घालण्याचा प्रस्तावही समोर आला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कायम बंद ठेवणे अशक्‍य असल्याने मेट्रो, लोकल आदी १ जुलैनंतर सुरू करण्याबाबतही चर्चा होणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com