prime minister narendra modi said go vocal for local to nations address | Sarkarnama

'लोकलसाठी व्होकल व्हा'; पंतप्रधान मोदींचा नारा

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जून 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात अनलॉक-2 मधील आव्हानांचा आढावा घेत महत्वाच्या निर्णयांची घोषणा केली. 

नवी दिल्ली : देशातील आर्थिक चक्र अधिक गतिमान करण्यासाठी आगामी काळात प्रयत्न आणखी वाढविण्याचे संकेत देतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'लोकलसाठी व्होकल' होण्याचे आवाहन आज देशवासीयांना केले. देशात अधिकाधिक रोजगार स्थानिक पातळीवर कशा पद्धतीने निर्माण होईल यावर भर दिला जाणार आहे. यातून स्थलांतरित मजुरांचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला. मोदींनी स्थानिक उद्योगांवर भर देण्याचा संदर्भ देताना चीनचा मात्र, उल्लेख केला नाही. 

मोदी यांनी आज देशातील जनतेला उद्देशून भाषण केले. या भाषणात त्यांनी अनलॉक-2 मधील आव्हानांचाही आढावा घेतला. ते म्हणाले की, आपण आता अनलॉक-1 मधून अनलॉक-2 मध्ये जात आहोत. कोरोना विरोधातील लढ्यात जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील स्थिती स्थिर आहे.  वेळेत घेतलेले निर्णय आणि उपाययोजना यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. अनलॉक 2.0 मध्ये जातना अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आता थंडी, ताप, खोकल्याचा हंगाम सुरू होत आहे. या परिस्थितीत मी देशवासीयांना आवाहन करतो की, त्यांनी स्वत;ची काळजी घ्यावी. अनलॉक 1 मध्ये अनेक जण बेफिकीर झाल्याचे दिसून आले. आता त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहेत. यामुळे मास्क इतर साधने वापरून तुमचे संरक्षण तुम्ही स्वतच करा. 

गरीब, पिडीत, शोषित वंचितांना सक्षम करण्यावर सरकारला भर राहील. आर्थिक विकासासाठी प्रयत्न करताना आपला नारा असेल  'लोकलसाठी व्होकल'. यातून आपण स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करुन स्थलांतरित मजुरांची समस्या सोडवू शकू. हे साध्य करण्यासाठी देशातील 130 कोटी नागरिकांना एकत्र यावे लागेल आणि काम करावे लागेल, असे मोदी यांनी सांगितले. 

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा मोदी यांनी केली. ते म्हणाले की, या अंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत धान्य दिले जाणार आहे. या योजनेत आतापर्यंत 1.75 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. मागील तीन महिन्यांत 20 कोटी गरीब नागरिकांच्या खात्यात 31 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. याचबरोबर 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. गरीबांना मोफत धान्य देण्याची योजना नोव्हेंबरअखेरपर्यंत सुरू राहील. गरीब, गरजूंना आता मोफत 5 किलो गहू अथवा 5 किलो तांदूळ आणि 1 किलो चनाडाळ दरमहा दिली जाते. यातून देशातील सुमारे 80 कोटी नागरिकांना फायदा होईल, असे मोदी यांनी नमूद केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख