पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनबाबत केंद्र सरकारची भूमिका केली स्पष्ट - Prime Minister Narendra Modi made it clear that the central government has a role to play in the lockdown | Politics Marathi News - Sarkarnama

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनबाबत केंद्र सरकारची भूमिका केली स्पष्ट

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 एप्रिल 2021

आपल्याला अर्थचक्र आणि उद्योग विश्व कसं सुरू राहील, याची काळजी घेता येईल, असेही मोदी यांनी नमूद केले. 

नवी दिल्ली : आपल्याला सध्याच्या परिस्थितीत देशाला लॉकडाऊनपासून वाचवाचे आहे. माझे देशातील सर्व राज्यांना आवाहन आहे की, लॉकडाऊनचा विचार अंतिम पर्याय म्हणूनच करावा.लॉकडाऊनपासून वाचण्याचे सर्वार्थाने प्रयत्न करावेत. ‘मायक्रो कन्टेट झोन’वरच लक्ष केंद्रीत करावे. आपण आपली अर्थव्यवस्थाही सुधारू आणि देशातील नागरिकांच्या आरोग्याची काळजीही घेऊ, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनबाबत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली.

देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी देशाला उद्देशून भाषण केले. त्यांनी सुरुवातीलाच ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं, त्यांच्याबद्दल माझी सहवेदना व्यक्त केल्या.

ते म्हणाले की कोरोनाविरोधात देश मोठी लढाई लढत आहे. कोरोनाची दुसरी लाट तुफान बनून आली आहे. आव्हान मोठे असले तरी जिद्द, तयारीच्या जोरावर आपल्याला या संकटावर मात करायची आहे. आरोग्य कर्मचारी, पोलिस या सर्वांचे कौतुक आहे. कारण ते गेल्या वर्षीपासून दिवसरात्र रुग्णांची सेवा करत आहेत. देशात सध्या ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. यासाठी राज्य सरकारांसोबत काम केले जात आहे. प्रत्येक रुग्णाला ऑक्सिजनची मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. औषध निर्माण क्षेत्राकडून मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू आहे. 
 
देशातील शास्त्रज्ञांनी गेल्या वर्षीपासूनच लशीसाठी संशोधन सुरू केले होते. त्यांच्या परिश्रमाच्या जोरावर जगातील सर्वात स्वस्त लस आपल्याकडे उपलब्ध आहे. भारताने बनविलेल्या दोन लसीच्या जोरावर जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत बारा कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. आता १८ वर्षांवरील सर्व नागरिकांन लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या १ मे पासून हे लसीकरण करण्यात येणार आहे. भारतात सध्या जी लस निर्माण होणार आहे, त्यातील ५० टक्के लस ही राज्ये आणि रुग्णालयांना देण्यात येणार आहे, असही पंतप्रधान यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारची ४५ वर्षांवरील लसीकरण मोहीम सुरूच राहणार आहे. जे मोफत लसीकरण सध्या सुरू आहे, ते कायम राहणार आहे.  राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे कामगारांनाही लस मिळू लागली आहे. राज्य सरकारांनी कामगारांना आहे तिथेच राहण्यासाठीआग्रह करावा. त्यामुळे कामगारांचे स्थलांतर होणार नाही. त्यांना लस मिळेल आणि त्यांचा रोजगारही चालू राहील. त्यातून आपल्याला अर्थचक्र आणि उद्योग विश्व कसं सुरू राहील, याची काळजी घेता येईल, असेही मोदी यांनी नमूद केले. 

गेल्या वर्षी कोरोना आला, त्यावेळी आपल्या तोकड्या सुविधा होत्या. पण, सध्या आपण आरोग्य सुविधा निर्माण केल्या आहेत.  आता आपल्याकडे टेस्टिंग मोठ्या प्रमाणात होत आहे. पीपीई कीट व इतर सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे कठीण काळ असला तरीही जनतेने धीर सोडू नये, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. 
 
माझे युवकांना आवाहन आहे, त्यांनी छोट्या छोट्या कमिट्या बनवून कोरोना उपाय योजनांबाबत जनजागृती करावी. विनाकारण घराबाहेर पडू नये, यासाठी घरातील लोकांना समजावून सांगावे. प्रसारमाध्यमांनीही संकटाच्या काळात आणखी जनजागृती करावी. लोकांनी अफवांना बळी पडू नये, यासाठी प्रयत्न करावेत.  साहस आणि  धैर्याने काम केल्यास सध्याच्या परिस्थितीवर आपण नक्की विजय मिळवू, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख