पंतप्रधान मोदींचे सहा वर्षांत 9 दौऱ्यांचे धक्कातंत्र

चीनबरोबरच्या सीमा विवादाची धग कायम असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्व लडाखला आज अचानक भेट देऊन पुन्हा धक्कातंत्राचा वापर केल्याची प्रतीक्रिया उमटली आहे.
prime minister narendra modi and his unannounced national and international visits
prime minister narendra modi and his unannounced national and international visits

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 च्या नोटबंदीपासून यंदा  24 मार्चच्या लॉकडाऊनपर्यंत अनेक निर्णय धक्कातंत्राने घोषित केले आहेत. पंतप्रधानांनी देशविदेशांतील दौऱ्यांबाबतही हेच सूत्र ठेवलेले दिसते. आजही लडाखला अचानक भेट देऊन मोदींना याच धक्कातंत्राचा वापर केल्याचा दिसले. 

मोदी यांनी 2015 मधे पाकिस्तानमध्ये अचानक उतरण्यापासून दरवर्षीची दिवाळी सीमेवरील जवानांबरोबर साजरी करण्यापर्यंत अशाप्रकारे 9 दौरे केले आहेत. यातील 3 ते 4 वेळेस ते भारत-चीन सीमेवर पोहोचले हे लक्षणीय मानले जाते. एसपीजी सुरक्षा व्यवस्थेतील वरिष्ठ अधिकारी वगळता पंतप्रधानंच्या या दौऱ्यांबाबत कमालीची गुप्तता पाळली जात असल्याची माहिती आहे. 2017 मध्ये एका वरिष्ठ भाजप नेत्यांनी पत्रकारांना सांगितले होते की मोदी यांच्या अशा दौऱ्यांबाबत "तत्कालीन गृहमंत्री, विदेशमंत्री व भाजपाध्यक्ष वगळता भाजप नेते व केंद्रातील मंत्र्यांनाही अनेकदा थेट दूरचित्रवाणीवरूनच माहिती समजते.' 

चीनने भारताची कुरापत काढलेल्या गलवान खोऱ्यातील तणाव कायम असून चीनही येथून मागे हटण्यास तयार नाही. मात्र आज खुद्द मोदींनी लष्करप्रमुखांसह लडाखला भेट दिल्याने भारतीय जवानांचे मनोबल वाढण्यास मदत झाली आहे.

धक्कातंत्र दौरे असे : 
23 ‌‌‌ऑक्‍टोबर 2014 : 
पंतप्रधान झाल्यावर पहिलीच दिवाळी मोदींनी सियाचीनमध्ये भारत-चीन सीमेवर जाऊन साजरी केली. जगातील या सर्वांत उंचावरील युध्दक्षेत्राला भेट देऊन मोदींनी, जवानांबरोबर दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरू केली. 

11 नोव्हेंबर 2015 : पंतप्रधानांनी अमृतसरमध्ये जवानांबरोबर दिवाळी साजरी केली. डोगराई वॉर मेमोरियलला भेट देऊन त्यांनी 1965 च्या भारत-पाक युध्दातील हुतात्मायांना आदरांजली वाहिली. परमवीरचक्रविजेते अब्दुल हमीद यांच्या समाधीवर जाऊनही त्यांनी पुष्पचक्र अर्पण केले होते. 

25 डिसेंबर 2015 : अफगाणिस्तानच्या दौऱ्यावरून परतताना नियोजनात नसतानाही पंतप्रधानांचे विमान अचानक पाकिस्तानात उतरले आणि तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या घरच्या लग्नसमारंभाला त्यांनी हजेरी लावली. तब्बल 90 मिनिटे ते पाकिस्तानाच्या हद्दीत होते. त्यांच्या या कृतीने सारे जग चक्रावले. 

30 ऑक्‍टोबर 2016 : हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील सुमडो येथे भारत-चीन सीमेला भेट देऊन मोदींनी जवानांबरोबर वार्तालाप केला. 2001 पासून आपण प्रत्येक दिवाळी जवानांबरोबरच साजरी करतो, असेही त्यांनी सांगितले. 

18 ऑक्‍टोबर 2017 : जम्मू-कश्‍मीरच्या गुरेज सेक्‍टरमध्ये जाऊन त्यांनी त्यावर्षीची दिवाळी साजरी केली व जवानांना आपण कुटुंबीयच मानतो असे सांगितले. अत्यंत अवघड परिस्थितीत जवानांची सेवा ही तपश्‍चर्या व त्यागाचे मूर्तिमंत रूप आहे, अशा शब्दांत त्यांनी सरहद्दीवरील जवानांचा उत्साह वाढविला. 

7 नोव्हेंबर 2018 : मोदी यांनी त्या वर्षी उत्तराखंडच्या हर्षील भागातील भारत-तिबेट सरहद्द दलाच्या (आयटीबीपी) जवानांबरोबर दिवाळी साजरी केली. त्याचबरोबर केदारनाथची पूजा करून तेथील विकासकामांचाही त्यांनी आढावा घेतला. 

27 ऑक्‍टोबर 2019 : जम्मू-काश्‍मीरमधून कलम 370 हटविण्याचा कायदा संसदेत मंजूर झाल्यावर मागील वर्षी दिवाळीनिमित्त पंतप्रधानांनी जम्मूच्या राजौरीतील भारत-पाक नियंत्रणरेषेला (एलओसी) भेट दिली आणि तेथे तैनात असलेल्या जवानांना मिठाई भरवून दिवाळी साजरी केली. 

19 फेब्रुवारी 2020 : अल्पसंख्यांक मंत्रालयातर्फे दिल्लीत सुरू असलेल्या राजपथावरील हुनर हाट या प्रदर्शनाला मोदींनी यंदा अचानक भेट दिली व खाटेवर बसून बिहारी "लिट्टी चोखा'चा आस्वाद घेतला. तेथील वेगवेगळ्या स्टॉलवर जाऊन त्यांनी छोट्या उद्योजकांचा उत्साहही वाढवला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com