political leaders prefer private hospitals over government hospitals | Sarkarnama

कोरोना झाल्यावर नेते म्हणताहेत, गड्या आपले खासगी रुग्णालयच बरे..!

वृत्तसंस्था
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

देशात कोरोनाचा कहर वाढत आहे. याचबरोबर आरोग्य व्यवस्थेवरील ताणही वाढत आहे. अनेक सामान्य नागरिकांना उपचार मिळत नसताना नेते मात्र, कोरोनाची लागण झाल्यानंतर खासगी रुग्णालयांकडे धाव घेत आहेत. 

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा कहर वाढत असून, अनेक राजकीय नेतेही कोरोना पॉझिटिव्ह सापडू लागले आहेत. मात्र, बहुतांश नेते हे कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी खासगी रुग्णालयांना प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेते खासगी रुग्णालयांनाच पसंती देताना दिसत आहेत. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुडगावमधील हे खासगी रुग्णालय आहे. यावरुन विरोधकांनी शहा यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. काँग्रेस नेते शशि थरुर यांनी या मुद्द्यावरुन शहा यांना लक्ष्य केले होते. शहा यांनी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) उपचारासाठी जाण्याऐवजी शेजारील हरियाना राज्यातील खासगी रुग्णालयाची निवड केली, अशी टीका थरुर यांनी केली होती. 

याच मुद्द्यावरुन सोशल मीडियावरही शहा टीकेचे धनी झाले होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार घेणारे शहा एकटेच नाहीत. केंद्र आणि राज्यांमधील सुमारे 20 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. यातील तब्बल 17 जणांनी उपचारासाठी खासगी रुग्णालयांना पसंती दिली आहे. यात अमित शहा यांच्यासोबत आम आदमी पक्षाचे (आप) नेते व दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन, भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा आणि भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांचाही समावेश आहे. 

खासगी रुग्णालयात उपचार घेण्यात इतर पक्षांचे नेतेही आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात दाखल झाले होते. महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले होते. पंजाबमधील काँग्रेस नेते व ग्रामविकास मंत्री तृप्तसिंग बाजवा हे चंडीगडमधील फोर्टिस रुग्णालयात दाखल झाले होते. 

यात काही सरकारी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नेत्यांचे अपवादही आहेत. उत्तर प्रदेशच्या तंत्रशिक्षण मंत्री कमलराणी वर्मा यांना संजय गांधी पोस्ट गॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सत्पाल महाराज यांना ऋषिकेश येथील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. सामान्य नागरिकांप्रमाणे सरकारी रुग्णालयात उपचार घेऊन आरोग्यव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी नेते खासगी रुग्णालयांकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख