police will record family members statements in sushant singh rajput suicide case | Sarkarnama

सुशांतच्या आत्महत्येचे गूढ वाढले; कुटुंबीयांचा पोलीस पुन्हा नोंदविणार जबाब

वृत्तसंस्था
सोमवार, 29 जून 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येची पोलीस चौकशी करीत असून, यात नवीन माहिती आता समोर येऊ लागली आहे. 

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचा पोलीस तपास करीत आहे. तपासात काही नवीन माहिती समोर आली असून, या माहितीची पडताळणी करण्यासाठी पोलीस पुन्हा सुशांतच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवणार आहे. यापूर्वीही पोलिसांनी सुशांतच्या वडिलांसह कुटुंबातील इतर सदस्यांचा जबाब नोंदवला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतच्या आत्महत्येमागील सर्व कारणे पडताळली जात आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 27 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. सुशांतच्या कुटुंबीयांना पुन्हा जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले आहे. सुशांतचा अंतिम शवविच्छेदन अहवाल नुकताच मिळाला आहे. गळफास घेतल्यानेच सुशांतचा मृत्यू झाल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. 

सुशांतचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यात सुशांतचा मृत्यू हा गळफास घेतल्याने झाल्याचे नमूद केले आहे. या अहवालावर अंधेरीतील कूपर रुग्णालयातील पाच डॉक्‍टरांनी स्वाक्षरी केली आहे. शवविच्छेदन अहवालानुसार, त्याच्या शरीरावर कोणत्याही जखमा दिसून आल्या नाहीत. दरम्यान, सुशांतने कुठले विषारी द्रव्य किंवा पदार्थ खाल्ला नव्हता ना याचाही तपास करण्यात येत आहे. प्रयोगशाळेकडून त्याबाबतचा अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाही. 

सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिलाही पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुशांत याच्या आत्महत्येचे गूढ अद्याप उलगडले नसून त्याबाबत वांद्रे पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. सोशल मीडियासह सर्वसामान्यांमध्ये सुशांतच्या आत्महत्येबाबत वेगवेगळे तर्क, अंदाज वर्तविले जात आहेत. सुशांतच्या आत्महत्येसंदर्भात सोशल मीडियावर कोणतीही अफवा पसरविणारी माहिती पसरवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

मोदी सरकारचा टिकटॉकसह 59 चिनी अॅप्सना दणका 
नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या सैन्यात पूर्व लडाखमध्ये गल्वान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. यानंतर देशभरात चीनविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. केंद्रातील मोदी सरकार काहीच कार्यवाही करीत नसल्याने विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले होते. आता केंद्र सरकारने लोकप्रिय टिकटॉक अॅप आणि यूसी ब्राऊजरसह 59 चिनी अॅपवर बंदी घातली आहे. 
चिनी अॅप देशाच्या सार्वभौमतेला आणि एकात्मतेला धोका निर्माण करीत आहेत. याचबरोबर ते देशात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करीत आहेत. यामुळे अशा चिनी अॅपवर बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती व दूरसंचार मंत्रालयाने दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख