नेपाळ ते चंबळ खोरे...विकास दुबेचा शोध सुरु

कानपूर जिल्ह्यातील बिकरू गावात विकास दुबेचे घर आहे. २ जुलैच्या रात्री ३२ पोलिसांचे पथक त्याला पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी विकास दुबे व त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर तुफान गोळीबार केला. त्यात एका अधिकाऱ्यासह आठ पोलिस हुतात्मा झाले. त्यानंतर विकास दुबे गायब झाला. तो नेपाळला गेला असल्याचा संशय आहे.
Police Trying to trace Vikas Dubey From Nepal to Chambal
Police Trying to trace Vikas Dubey From Nepal to Chambal

लखनौ : आठ पोलिसांची हत्या करणारा कुख्यात गुन्हेगार विकास दुबेचा नेपाळची सीमा ते चंबळचे खोरे असा सर्वदूर शोध घेतला जात आहे. २ जुलैला पोलिसांची हत्या करुन विकास दुबे फरार झाला आहे. त्याच्या शोधासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी ५० पथके तयार करुन विविध ठिकाणी पाठवली आहेत.

कानपूर जिल्ह्यातील बिकरू गावात विकास दुबेचे घर आहे. २ जुलैच्या रात्री ३२ पोलिसांचे पथक त्याला पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी विकास दुबे व त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर तुफान गोळीबार केला. त्यात एका अधिकाऱ्यासह आठ पोलिस हुतात्मा झाले. त्यानंतर विकास दुबे गायब झाला. तो नेपाळला गेला असल्याचा संशय आहे. त्यामुळे लखीमपूर येथे नेपाळ सीमेवर कडक नजर ठेवण्यात आली आहे. 

चंबळमध्ये लपल्याचा संशय

दुबे मध्यप्रदेशातल्या चंबळच्या खोऱ्यात लपला असल्याचाही संशय आहे. त्या दृष्टीनेही शोध सुरु करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर तो नक्की कुठल्या दिशेने गेला, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. कालपर्यंत विकास दुबेवर एक लाखांचे ईनाम लावण्यात आले होते. ते अडीच लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. विकास दुबेला पकडणे हा आता पोलिसांच्या दृष्टीनेही प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. कारण या संपूर्ण प्रकरणात खाकी वर्दीवरही प्रश्नचिन्ह आहे. कुणी घरभेदी नसता तर पोलिसांचे बळी पडलेच नसते, ही वस्तुस्थिती आता समोर आली आहे. 

गावोगावी चिकटवली पोस्टर

पोलिसांनी विकास दुबेचा शोध सुरु केल्यानंतर आता त्याची नवनवी कृत्ये समोर येत आहेत. लोक हळूहळू त्याच्या कारवायांबद्दल बोलायला लागले आहेत. पोलिसांनी विकास दुबेवर जाहीर केलेल्या ईनामाची पोस्टर त्याच्या फोटोसह गावोगावी चिकटवली आहेत. त्याच्या घराशेजारी एक विहिर आढळली असून ती उपसण्याचे कामही सुरु करण्यात आले आहे. या विहिरीतही विकास दुबे विरुद्ध काही पुरावे मिळतील, अशी पोलिसांना अपेक्षा आहे. 

अनेक राजकीय पक्षांशी दुबेचे संबंध

गँगस्टर विकास दुबे याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची घटना 2 जुलैला रात्री घडली होती. यात आठ पोलीस ठार झाले होते. यामुळे विकास दुबे हे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले आहे. राजनाथसिंह यांचे सरकार उत्तर प्रदेशात असताना एका मंत्र्यांची हत्या केल्याचाही आरोप दुबे याच्यावर आहे. उत्तर प्रदेशात त्याच्यावर तब्बल 60 गुन्हे दाखल आहेत. 

विकास दुबे याने 2001 मध्ये पोलीस ठाण्यात घुसून राजनाथसिंह यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री संतोष शुक्ला यांची हत्या केली होती. या हत्येमुळे तो उत्तर प्रदेशसह राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला होता. त्याने 2000 मध्ये कानपूरमधील ताराचंद इंटर कॉलेजच्या सहाय्यक व्यवस्थापकाचा खून केला होता. त्याचवर्षी कानपूर कारागृहात असतानाच त्याने रामबाबू यादव यांच्या हत्येचा कट आखला होता. नंतर 2004 मध्ये केबल व्यावसायिक दिनेश दुबे खून प्रकरणातही त्याचा समावेश होता. दुबेने 2018 मध्ये त्याच्या चुलतभावावरच खुनी हल्ला करवून आणला होता. 

विकास दुबेने 2002 मध्ये मोठ्या प्रमाणात जमिनी बळकावल्या होत्या. त्यामुळे कानपूर शहरासह बिलहार, शिवराजपूर, रिनयान आणि चौबेपूर या भागात त्याची दहशत आहे. काल झालेली चकमक ही चौबेपूर भागातच झाली होती. येथेच दुबे आणि त्याच्या साथीदारांनी आठ पोलिसांना ठार केले. दुबे याचे अनेक राजकीय पक्षांशी जवळचे संबंध आहेत. शिवराजपूर नगर पंचायतीच्या निवडणुकीत कारागृहातून निवडून येण्याचा विक्रमही त्याच्या नावावर नोंद आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com