pakistan high commission officers in delhi caught spying | Sarkarnama

कोरोनाच्या काळातही पाकिस्तानची हेरगिरी; भारतातून अधिकाऱ्यांची होणार हकालपट्टी

वृत्तसंस्था
सोमवार, 1 जून 2020

पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांकडून हेरगिरी करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे खडबडून जागे झालेल्या सरकारने या अधिकाऱ्यांची पाकिस्तानला रवानगी केली आहे. 

नवी दिल्ली : भारतात हेरगिरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील दोन राजनैतिक अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते. केंद्र सरकारने त्यांना तत्काळ देश सोडण्याचा आदेश दिला आहे. भारताच्या या कृतीवरुन पाकिस्तानने आकांडतांडव करण्यास सुरुवात केली आहे. भारताची ही कारवाई म्हणचे व्हिएन्ना कराराचे उल्लंघन असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना संकटाच्या काळातही पाकिस्तानकडून हेरगिरी सुरू असल्याचे यामुळे समोर आले आहे.

पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अबिद हुसेन आणि मोहंमद ताहीर या दोन अधिकाऱ्यांना काल दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पकडले. भारतीय सुरक्षेशी निगडीत संस्थांचे गोपनीय दस्तावेज एका भारतीय व्यक्तीकडून मिळविण्याच्या प्रयत्नात ते होते. त्यांच्याकडून गोपनीय दस्तावेज, दोन आयफोन आणि पंधरा हजार रुपये असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. उद्योजक असल्याचे भासवून गुप्त माहिती मिळविण्याचा या दोघांचा प्रयत्न होता. या दोन्ही अधिकाऱ्यांनी इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) या पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणेसाठी काम करत असल्याची कबुली दिली आहे. 

हे देखील वाचा : काळजी घ्या...देशात कोरोनाचे सामूहिक संक्रमण सुरू 

या दोन अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून समज दिली. या दोन्ही अधिकाऱ्यांना २४ तासात देश सोडण्याचा आदेश काल दिला होता. दरम्यान, पाकिस्तानने या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानने याबाबत इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवला आहे. भारताने दोन्ही अधिकाऱ्यांवर लावलेले हेरगिरीचे आरोप पूर्णपणे असून राजनैतिक संबंधांचे आणि जिनिव्हा कराराचे उल्लंघन करणारे आहेत, असे पाकिस्तानने म्हटले आहे. 

काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा 

जम्मू : लॉकडाउनच्या काळात काश्‍मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या असून, लष्कराने याविरोधात कडक मोहीम सुरू केली आहे. नौशेरा सेक्टरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलादरम्यान सोमवारी पहाटे झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. राजौरी जिल्ह्यालगतच्या नौशेरा सेक्टरमधून आज पहाटे दहशतवादी घुसखोरी करत असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. त्यानुसार सुरक्षा दलाच्या जवानांनी परिसरात गस्त वाढवली. या वेळी दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली. यात तीन दहशतवादी ठार झाले. त्यांचे ओळख पटवण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, पूँच, कथुआ, सांबा जिल्ह्यालगतच्या सीमावर्ती भागात सीमेपलीकडून मोठ्या प्रमाणात घुसखोरी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील गावांमध्ये लष्कराने कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. या भागातील तपासणी नाक्यांना दक्ष राहण्याचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख