pakistan and china are planning biological warfare against india and other countries | Sarkarnama

सावधान : चीन अन् पाकिस्तान आखतोय भारताविरुद्ध जैविक युद्धाचा कट

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 जुलै 2020

पाकिस्तान आणि चीन या देशांनी कायम भारताची डोकेदुखी वाढविली आहे. दोन्ही देशांकडून सीमेवर कायम कुरबुरी सुरू असतात. चीनचे गल्वान खोऱ्यात घुसखोरी करुन थेट भारताला आव्हान देण्याचा प्रकार नुकताच केला होता. 
 

बीजिंग : भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमेवर कायम तणावाचे वातावरण असते. गल्वान खोऱ्यातील संघर्षानंतर आता चीननेही उघड संघर्षाची भूमिका घेतली आहे. भारताचे हे दोन्ही शेजारी देश सर्वच पातळ्यांवर कायम डोकेदुखी ठरत आले आहेत. आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे हे दोन्ही देश भारताविरोधात जैविक युद्धाचा कट आखत आहेत. यामुळे आगामी काळात भारतीय गुप्तचर यंत्रणांना आणखी दक्ष राहावे लागणार आहे. 

चीन आणि पाकिस्तान एकत्र येऊन केवळ भारतच नव्हे तर अन्य पाश्‍चिमात्य देशांविरुद्ध जैविक युद्धाचा कट आखत आहेत. ही बाब 'द क्लॅक्सॉन'ने विविध गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याच्या आधारे जाहीर केलेल्या संशोधन अहवालातून उघडकीस आली आहे. चीन पाकिस्तान यांच्यात जैविक शस्त्रास्त्रे विकसित करण्यासाठी तीन वर्षांचा गुप्त करार झाला आहे. ॲंथ्रॅक्ससारख्या धोकादायक जैविक अस्राचा वापर करण्याबाबत विचार केला जात असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. 

या अहवालानुसार, चीनमधील वुहानच्या ज्या प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग पसरल्याचा दावा अमेरिका करत आहे, त्याच प्रयोगशाळेत पाकिस्तानला हाताशी धरून जैविक युद्धाचा कट रचला जात आहे. भारताबरोबरच पश्चिमेकडील अमेरिकेसारख्या देशांना लक्ष्य ठेऊनच कट आखला जात आहे. या देशात संसर्गाचा प्रसार केला जाईल, असा उद्देश आहे. या संशोधनावर होणारा खर्च वुहानची प्रयोगशाळा उचलणार आहे. यासाठी मातीशी निगडीत चाचण्या करण्यात आल्या आहेत. चीनने पाकिस्तानच्या शास्त्रज्ञांना यासंदर्भातील आवश्‍यक ती माहिती, तंत्रज्ञान आणि इतर साधने उपलब्ध करुन दिलीआहेत. 

चीनने भारताविरुद्ध कट रचण्यासाठी पाकिस्तानचा वापर करीत आहे. भारत आणि पाश्‍चिमात्य देशांच्या गुप्तचर संस्थांना या कटाची माहिती आता मिळाली आहे. या कटासाठी चीन थेट आपल्या भूमीचा वापर करु देणार नसून, सर्व चाचण्या पाकिस्तानमध्ये करण्यात येणार आहेत. पाकिस्तानच्या प्रयोगशाळेतून संसर्ग बाहेर पडल्यास कोणत्याही उपाययोजना तो रोखण्यासाठी नसल्याची धक्कादायक बाबही समोर येत आहे. 
 
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोना संसर्ग चीनच्या प्रयोगशाळेतून पसरला असून, त्याचे पुरावे असल्याचे म्हटले होते. या आधारावर जैविक अस्त्राच्या शक्यतेला बळ मिळत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गुप्तचर संस्थांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, ॲंथ्रेंक्ससारख्या विषाणूचा वापर जैविक अस्त्र म्हणून होण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे आगामी काळात भारतासह इतर देशांना चीनसह पाकिस्तानच्या हालचालींवरही बारकाईने नजर ठेवावी लागणार आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख