opposition parties urged centre to declare cyclone amphan national calamity | Sarkarnama

देशातील 22 विरोधी पक्षांनी एकत्र येऊन केला हा ठराव

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 मे 2020

अम्फान या चक्रीवादळामुळे ओडिशात आणि पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा, अशी एकमुखी मागणी देशभरातील 22 विरोधी पक्षांनी केंद्र सरकारकडे शुक्रवारी केली. 

नवी दिल्ली ः अम्फान चक्रीवादळ राष्ट्रीय आपत्ती जाहीर करुन याचा फटका बसलेल्या राज्यांना तातडीने भरीव मदत केंद्र सरकारने करावी, असा ठराव विरोधा पक्षांनी मांडला आहे. आज 22 विरोधी पक्षांच्या 22 नेत्यांची आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली.

या बैठकीत याविषयी ठरावही संमत करण्यात आला. या ठरावात म्हटले आहे की, सध्याच्या स्थितीत प्रामुख्याने मदत आणि पुनर्वसन यावर भर देण्याची आवश्यकता आहे. सर्व विरोधी पक्षांनी पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांचे अम्फान चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. या कठीण काळात या राज्यांच्या मागे उभे असल्याचे विरोधी पक्षांनी म्हटले आहे. 

कोरोना संकटामुळे आधीच फटका बसलेला असताना आता अम्फान चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे जनतेला फार मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे केंद्र सरकारने तातडीने अम्फान चक्रीवादळ हे राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करावे. याचबरोबर याचा फटका बसलेल्या राज्यांना तत्काळ पुरेशी मदत द्यावी, असे ठरावात म्हटले आहे. 

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ही विरोधी पक्षांची बैठक बोलाविली होती. या बैठकीला तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक आणि डाव्या पक्षांसह इतर पक्षांची उपस्थिती होती. 

पश्‍चिम बंगालला तडाखा 

पश्‍चिम बंगालमधील कोलकातासह काही भागांत अम्फान चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला. वादळ आणि पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले. वेगवेगळ्या घटनांमध्ये १२ जण ठार झाले, तर शेकडो घरांचे नुकसान झाले, हजारो झाडे उन्मळून पडली, अनेक वाहनांचेही नुकसान झाले. वादळाचा शेतीपिकांनीही मोठा फटका बसला. राज्यातील जवळपास ५ लाखापेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. राज्यातील २४ परगणा जिल्ह्यात ५ हजार ५०० घरांचे नुकसान झाले तर दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीररित्या जखमी झाले. वादळी वारे आणि पावसाचा कोलकता शहरालाही मोठा तडाखा बसला. पावसामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली गेले होते. रस्त्यांलगची आणि शेतातील हजारो झाले उन्मळून पडली. शेकडो घरांचे नुकसान झाले. अनेक भागांत वीज पुरवठा खंडीत झाला होता. 

ओडिशात नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश 

अम्फान चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे जिल्हानिहाय पंचनामे करून दोन दिवसांत प्राथमिक नुकसान अहवाल सादर करण्याचे आदेश ओडिशा सरकारने राज्यातील सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यातील जगतसिंगपूर, केंद्रापारा, भद्रक आणि बालासोर तसेच मयुरभंज जिल्ह्याच्या उत्तर भागात अम्फान चक्रीवादळाचा तडाखा बसला. वादळामुळे सरकारी इमारती, शेतीपिकांचे तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले. शेकडो घरांनाही वादळाचा फटका बसला, तसेच वीजचे तार आणि खांबांचे नुकसान झाले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख