सचिन पायलटांनी माफी मागितली तरच त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश : सुरजेवाला  - Only if Sachin Pilot apologizes to the High Command will he rejoin the party: Surjewala | Politics Marathi News - Sarkarnama

सचिन पायलटांनी माफी मागितली तरच त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश : सुरजेवाला 

वृत्तसंस्था
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

गेहलोत हे पायलटांना पाण्यात बघतात. त्यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे.

नवी दिल्ली : राजस्थानात आमच्या सरकारला कोणताही धोका नाही. मुख्यमंत्री अशोक गेहलोतांकडे बहुमत आहे असा दावा करतानाच सचिन पायलट यांना पुन्हा कॉंग्रेसमध्ये यायचे असेल तर त्यांना प्रथम हायकमांडची माफी मागावी लागेल असे कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे. 

पायलट हे पुन्हा पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यास तयार असल्याचे वृत्त आहे. गेल्या काही दिवसापासून राजस्थानात त्यांच्याच बंडखोरीमुळे कॉंग्रेस सरकार अडचणीत आले आहे. गेहलोत यांनी पायलटांवर निशाणा साधताना त्यांना गद्दार म्हटले होते. त्यांच्या घरवापसीबाबत सुरजेवाला यांनी थेट पायलटांना लक्ष्य केले नाही. मात्र त्यांना कॉंग्रेस हायकमांडची माफी मागावी लागेल असे स्पष्ट केले. 

गेहलोत हे पायलटांना पाण्यात बघतात. त्यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. जर पायलट पुन्हा पक्षात सक्रिय होणार असतील तर गेहलोत नाराज होणार नाहीत का ? याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, "" स्वाभाविक आहे. कॉंग्रेसचे गेहलोत हे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी पक्ष उभा करण्यासाठी कष्ट घेतले आहेत. जर पक्षाचे सरकार एखाद्या व्यक्तीमुळे अडचणीत आले तर राग येणे समजण्यासारखे आहे. त्यांनी खूपच जबाबदारीने काम केले आहे. भाजपशी संगनमत करून पायलट यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला असे असेल तर गेहलोतांनी वापरलेली भाषा चुकीची होती असे म्हणता येणार नाही. 

राजस्थानात कॉंग्रेसकडे आता किती आमदार आहे ? असा सवाल सुरजेवाला यांना केला असता ते म्हणाले, की आमच्याकडे आजही 102 आमदार आहेत. आमच्याकडे बहुमताचा आकडा आहे आणि सरकारला कोणताही धोका नाही. हे सरकार पडणार नाही असा मला विश्वास आहे. कॉंग्रेस सभागृहात आपले बहुमत सिद्ध करेल यामध्ये कोणी शंकाही घेण्याचे कारण नाही. 

गेल्या शनिवारी जैसलमेरमध्ये ज्या हॉटेलमध्ये कॉंग्रेस आमदारांना ठेवले आहे तेथे माध्यमांशी बोलताना गेहलोत म्हणाले होते, की कॉंग्रेसचे जे बंडखोर आमदार आहेत त्यांच्याविषयी आपली कोणतीही तक्रार नाही. मतभेद असू शकतात. त्यांनी पक्षात सक्रिय व्हावे. आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत. जर बंडखोरांनी हायकमांडची माफी मागितली तर प्रश्‍न येतोच कोठे ? हायकमांड जो आदेश देईल तो पाळणे माझे कर्तव्यच आहे. 

सचिन पायलट यांनी भाजपमध्ये जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. त्यानंतर पक्षाने त्यांच्याशी अनेकदा चर्चा केली मात्र ते आपला पत्ता अजूनही उघड करण्यास तयार नाहीत. पायलट यांनी राजस्थानात प्रदेशाध्यक्ष म्हणून खूपच चांगले काम केले आहे. 

दरम्यान, ज्येष्ठ नेते मनीष तिवारी यांनी काल ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांच्यावर कडाडून हल्ला केला होता. या दोघांना पक्षात आयते मिळाले. त्यांनी पोलिसांच्या कधी लाठ्याकाठ्या खाल्या नाहीत किंवा त्यांनी कधी सतरंजीही उचलली नाही अशी टीकाही त्यांनी केली होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख