north korean leader kim jong un disappears again amid speculations of death | Sarkarnama

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन पुन्हा गायब

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जून 2020

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन पुन्हा एकदा गायब झाले आहेत. यामुळे ते गंभीर आजारी अथवा त्यांचा मृत्यू झाल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. 

प्योगँग : उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत असतात. मागील काही काळापासून मात्र, ते सातत्याने गायब होत असल्याने ते गंभीर आजारी अथवा त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर ही चर्चा थांबली होती. परंतु, मागील तीन आठवड्यांपासून ते परत गायब झाल्याने पुन्हा या चर्चेने उचल खाल्ली आहे. काही तज्ज्ञांच्या मते किम यांच्या जागी बनावट व्यक्ती सरकारी माध्यमे दाखवत आहेत. 

किम जोंग-उन हे मागील तीन महिन्यांपासून सातत्याने सार्वजनिक जीवनातून गायब होत आहेत. मागील तीन आठवड्यांपासून ते गायब झाले आहेत. किम हे 36 वर्षांचे आहेत. ते सुरुवातीला 20 दिवस गायब झाले होते. त्यांच्यावरील हृदय शस्त्रक्रियेमुळे गुंतागुंत वाढून ते गंभीर आजारी अथवा त्यांच्या मृत्यू झाल्याची चर्चा त्यावेळी सुरू झाली होती. त्यानंतर ते 1 मे रोजी पुन्हा एकदा सार्वजनिक जीवनात प्रकट झाले होते. नव्याने उभारलेल्या खतनिर्मिती प्रकल्पाला त्यांनी भेट दिली होती.  

त्यानंतर तीन आठवडे गायब झाल्यानंतर किम 24 मे रोजी पुन्हा एकदा दिसले होते. त्यांच्या आरोग्याविषयी वेगवेगळ्या अफवा पसरत असल्याने देशाच्या अण्वस्त्र सज्जतेची चर्चा त्यांनी त्यावेळी केली होती. तेव्हापासून ते पुन्हा गायब झाले असून, ते अद्याप सार्वजनिक ठिकाणी दिसलेले नाहीत. 

आता उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी जनतेला आवाहन केले असून, कोरिया द्वीपकल्पात वाढत असलेल्या तणावाच्या प्रसंगी किम यांच्याशी सर्वांनी उभे राहावे, असे म्हटले आहे. किम यांनी देशाचा कारभार हाती घेतली त्याला काल चार वर्षे झाली आहेत. मात्र, मागील वर्षी सरकारी पातळीवर झालेल्या जल्लोष यावर्षी दिसला नाही. 

किम हे मागील तीन महिन्यांत आता सर्वाधिक काळ सार्वजनिक जीवनातून दूर आहेत. गेल्या आठवड्यांत जपानच्या मंत्र्यांनी किम यांच्या प्रकृतीविषयी काही संशयास्पद असण्याची शक्यता व्यक्त केली होती. किम हे कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सार्वजनिक जीवनातून दूर आहेत, असा आरोपही त्यांनी केला होता. उत्तर कोरियाने  मात्र, देशात एकही कोरोना रुग्ण सापडला नसल्याचा दावा केला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख