किम जोंग उन म्हणतात, अण्वस्त्रे भक्कम करणार

उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन हे मागील काही काळ त्यांच्या प्रकृतीविषयीच्या बातम्यांनी चर्चेत आले होते. त्यांनी या चर्चांना पूर्णविराम देत नव्याने आक्रमक भूमिका घेतली आहे.
north korean dictator kim jong un threatens again
north korean dictator kim jong un threatens again

सोल : उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी आण्विक शस्त्रसाठा भक्कम करण्याचा निर्धार केला असून, देशासाठी व्यूहात्मक महत्त्व असलेल्या सशस्त्र दलांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. त्यादृष्टिने लष्कराची महत्त्वाची बैठक बोलाविण्यात आली व त्यात नव्या धोरणांविषयी सखोल चर्चा करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. 

कोरोना महामारी उद्भवल्यापासून गेल्या दोन महिन्यात किम जोंग उन यांचा सार्वजनिक वावर कमी झाला आहे. त्यातच  गेल्या महिन्यात त्यांच्या प्रकृतीवरून तर्कवितर्क लढविण्यात येत होते. त्यानंतर त्यांनी खताच्या कारखान्यातील एका कार्यक्रमात भाग घेतल्याची छायाचित्रे जगासमोर आली होती, त्यानंतर ते पुन्हा गायब झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले होते. अखेर येथील  सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार२० दिवसांच्या खंडानंतर पहिल्या ज्ञात सार्वजनिक कार्यक्रमात ते अवतीर्ण झाले. सत्ताधारी वर्कर्स पार्टीच्या मध्यवर्ती लष्करी आयोगाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले. ही बैठक कधी झाली याचा तपशील मात्र देण्यात आला नाही. 

अण्वस्त्र उपक्रम संपविण्याबाबत अमेरिकेबरोबरील चर्चा ठप्प असताना ही बैठक झाली. शत्रू पक्षाचे सततचे मोठे-छोटे धोके आश्वासकपणे रोखणे, त्यासाठी लष्करी अस्त्रांची भेदक क्षमता लक्षणीय प्रमाणावर वाढविणे याविषयी चर्चा झाली. रविवारी उत्तर कोरियातील रोडोंग सीन्मुन या मुख्य वृत्तपत्राने किम यांची काही छायाचित्रे प्रसिद्ध केली. खास शैलीतील माओ सूट परिधान केलेले, भाषण देतानाचे, कागदपत्रांवर काही लिहितानाचे आणि व्यासपीठावरील फलकाकडे काठी दाखवितानाचे अशी ही छायाचित्रे आहेत. ऑलीव्ह ग्रीन रंगाचे पोशाख घातलेले लष्करी जनरल्स किम बोलत असताना काही नोंदी लिहीत असल्याचेही या छायाचित्रांतून दिसून आले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com