no train should be sent to state says west bengal government | Sarkarnama

श्रमिक एक्स्प्रसेला पश्चिम बंगालमध्ये यामुळे `नो एंट्री`

वृत्तसंस्था
शनिवार, 23 मे 2020

अम्फान वादळाचा जोरदार तडाखा बसलेल्या पश्‍चिम बंगालने आता अन्य राज्यांतून येणाऱ्या मजुरांच्या गाड्यांचा मार्ग रोखून धरला आहे.

नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालचे मुख्य सचिव राजीव सिन्हा यांनी रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांना २२ मे रोजीच या संदर्भात पत्र लिहिले असून, यामध्ये त्यांनी अम्फान वादळामुळे राज्यातील पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. सध्या सर्वच जिल्ह्यांची प्रशासकीय यंत्रणा ही पुनर्वसन कार्यामध्ये व्यग्र असल्याने पुढील काही दिवस तरी या गाड्यांकडे आम्हाला लक्ष देता येणार नाही असे सिन्हा यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे. 

मृतांची संख्या वाढली 

या वादळामुळे मरण पावलेल्यांची संख्या ८५ वर गेली आहे. या वादळामुळे कोलकाता शहरात अनेक ठिकाणांवर विजेचे खांब कोलमडून पडले असून अनेक भागांतील वीज पुरवठा देखील ठप्प झाला आहे. शहरातील वीज पुरवठा सुरळीत केला जावा अशी मागणी करत आज स्थानिकांनी विविध ठिकाणांवर आंदोलन केले. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या लवकरच दक्षिण-२४ परगणा जिल्ह्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. 

 

वडाचे झाड कोसळले 

हावडा : हावडा येथील प्रसिद्ध वनस्पती उद्यानातील वडाचे एक मोठे झाड कोसळल्याने पर्यावरणप्रेमींमधून हळहळ व्यक्त होते आहे. येथील आचार्य जगदीशचंद्र बोस वनस्पती उद्यानात अनेक वर्षांपासून या वृक्षाचे जतन करण्यात आले होते असे संशोधक शिवकुमार यांनी सांगितले. 

 

देशातील रुग्णसंख्या सव्वा लाखावर 

देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, मागील 24 तासांत देशभरात तब्बल 6 हजार 600 रुग्ण सापडले आहेत. यातील सुमारे 3 हजार रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 लाख 25 हजार 101 झाली आहे. 

कोरोनाचा मृत्यूदर कमी 

देशातील कोरोनाचा मृत्यूदर आता 3.13 टक्क्यांवरुन आता 3.02 टक्क्यांवर आला आहे. कोरोनामुळे बळी पडणाऱ्या नागरिकांची संख्या शुक्रवारी 137 होती. यामुळे देशातील एकूण बळींचा आकडा 3 हजार 720 झाला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख